माय अहमदनगर वेब टीम
पुणे : सात वर्षीय मुलीला पाळीव कुत्रा चावल्यानंतर या प्रकरणी कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (२५ डिसेंबर) सायंकाळी ६.३० वाजता जुनी सांगवीतील जयमाला नगरात ही घटना घडली.
संजय विनायक पवार (रा. जयमाला नगर, जुनी सांगवी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रतीक्षा राजकुमार इंगोले (वय ७) असे जखमी मुलीचे नाव आहे. ज्योत्स्ना राजकुमार इंगोले (वय २६, रा. जयमाला नगर, जुनी सांगवी) यांनी याबाबत शनिवारी (२६ डिसेंबर) सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता इंगोले यांची सात वर्षाची मुलगी प्रतीक्षा वडिलांसोबत फोनवर बोलत होती. त्यावेळी आरोपीने पाळलेल्या तीन कुत्र्यांपैकी एक कुत्रा घराच्या बाहेर सोडला. त्या कुत्र्याने मुलीच्या पायाचा चावा घेतला. यात ती जखमी झाली आहे. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाला अटक केली आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Post a Comment