नगरमधील 'ही' ग्रामपंचायत बिनविरोधच्या मार्गावर



आमदार लंकेच्या अवाहनानुसार खडकी ता.नगर ग्रामपंचायत बिनविरोध वर शिक्कामोर्तब

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- गावाचा एकोपा ,एकसंघ पणा हा गावाचा आत्मा आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत भावकित, गावात संघर्ष उभा राहतो, पाच वर्षे रक्ताची नाती असणारे ,मित्र असणारे ऐकमेकांचे शत्रू बनतात. निवडणुकांमधून पुढाऱ्यांचे राजकारण सुरू रहाते पण गावचे गावपण संपून जाते.त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करा.पुढे प्रत्येकाने आपापले पक्षीय राजकारण कसेही करा पण गावाचे गावपण ,जिव्हाळा ,प्रेम नष्ट होऊ देऊ नका असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले.त्यानुसार खडकी ता नगर ग्रामपंचायत बिनविरोध करण्यावर ग्रामस्थांनी शिक्कामोर्तब केले.

पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा व २५ लाख विकास निधी घ्या असे आवाहन केले होते त्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. पारनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध करण्यावर एकमत होत असतानाच नगर तालुक्यातील जनतेनेही ग्रामपंचायत बिनविरोध करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे.

आज सकाळी आमदार लंके यांनी नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक असणाऱ्या गावातील लोकांची बैठक राष्ट्रवादी भवन अहमदनगर येथे आयोजित केली होती.या बैठकीला प्रवीण कोठुळे, शरद कोठूळे, पत्रकार जितेंद्र निकम, सरपंच अशोक कोठुळे, उपसरपंच भाऊसाहेब रोकडे, रावसाहेब कोठुळे, पंढरीनाथ कोठुळे, तंटा मुक्ती चे अध्यक्ष सुनील कोठुळे, राहुल बहिरट, आदिनाथ गायकवाड, अरुण कोठुळे, मनेश भोसले, चेअरमन ज्ञानदेव भोसले, राजू कोठुळे, माजी चेअरमन गोवर्धन कोठुळे,स्वप्नील कोठुळे, राजेंद्र पंढरीनाथ कोठुळे, विजय काळे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.यावेळी आमदार लंके यांनी निवडणूकांमुळे गावात होणारे वाद,तंटे, भावकितील संघर्ष यांचा गावाच्या एकोप्यावर आणि विकासावर कसा परिणाम होते हे सर्व गावकऱ्यांना सविस्तर सांगितले. पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार आणि खासदार यांच्या निवडणूक वेळी कोणी कोणाचेही काम करा, आपापला पक्ष धरा पण गावातील आणि भावकितील संघर्ष कमी करण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करा असे कळकळीचे आवाहन केले.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खडकी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय खडकी ग्रामस्थांनी घेतला. नगर तालुक्यातील पारनेर मतदार संघातील खडकी ही  पहिली ग्रामपंचायत बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब होत असतानाच खडकी ग्रामपंचायत  ५० वर्षानंतर बिनविरोध होत असल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे.


श्रेय लोकांचेच

निवडणूक बिनविरोध करण्यामागे माझी चांगली भावना आहे.मी ग्रामपंचायत पासून आमदार पदापर्यंत पोहचलो आहे.गावात कसे तंटे होतात, कसा संघर्ष असतो, जिरवा जिरवी कशी केली जाते आणि शेवटी हाती काही लागत  नाही.याचा अनुभव मला आहे.गावातील एकोपा आणि भावकितील एकता टिकण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हाव्यात अशी माझी भावना आहे.माझ्या आवाहनाला खडकी ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला ,त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे सर्व श्रेय ग्रामस्थानाच जाते...आमदार निलेश लंके

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post