हिवाळ्यात केस निरोगी ठेवण्यासाठी वापरा मधाचे ६ नैसर्गिक हेअर पॅक



 माय अहमदनगर वेब टीम

हेेल्थ डोेस्क -  हिवाळ्यामध्ये त्वचेप्रमाणेच आपल्या केसांमधील (Hair Care Tips) नैसर्गिक ओलावा देखील कमी होतो. यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊ लागतात. यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याच्या समस्येचाही सामना करावा लागतो. तसंच बदलत्या ऋतूनुसार केसगळती देखील सुरू होते. केसांशी संबंधित या समस्या दूर करण्यासाठी योग्य पद्धतीने हेअर केअर रुटीन फॉलो करणं आवश्यक आहे. 

निसर्गतः केस कोरडे (Hair Care) असणाऱ्यांनी हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी. अन्यथा केसांचे भरपूर नुकसान होऊ शकते. केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपण मधाचे हेअर पॅक वापरू शकता. मधाचा उपयोग करून आपण घरच्या घरी कित्येक नैसर्गिक हेअर पॅक तयार करू शकता. मधातील औषधी गुणधर्मामुळे केसांना ओलावा मिळतो तसंच केस चमकदार देखील होतात. मधापासून हेअर पॅक कसे तयार करायचे ? जाणून घेऊया योग्य पद्धत... 

​मध आणि अंड्याचे हेअर पॅक

मऊ आणि चमकदार केसांसाठी मध आणि अंड्याचे हेअर पॅक वापरा. मधामुळे केस हायड्रेट राहतात आणि अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर असते. ज्यामुळे केसांची चांगली वाढ होते. हे हेअर पॅक तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये अंड्याचे पांढरा भाग आणि एक मोठा चमचा मध एकत्र घ्या. हवे असल्यास आपण या मिश्रणामध्ये एक चमचा बदाम तेल देखील मिक्स करू शकता. २० ते ३० मिनिटांसाठी हेअर पॅक आपल्या केसांवर लावून ठेवा. यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.

​मध आणि कोकोनट क्रीम पॅक

या हेअर पॅकमुळे तुमचे केस चमकदार होण्यास मदत मिळेल. यासाठी आपण आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळणाऱ्या कोकोनट क्रीमचा वापर करू शकता. एका वाटीमध्ये क्रीम आणि एक चमचा मध एकत्र घ्या. दोन्ही सामग्री नीट एकजीव करून घ्या. यानंतर लेप टाळू आणि केसांवर लावा. हलक्या हाताने केसांचा मसाज करावा. तासाभरानंतर हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत.

​दूध आणि मध हेअर पॅक

या हेअर पॅकमुळे आपल्या केसांना पोषण तत्त्वांचा खोलवर पुरवठा होण्यास मदत मिळते. यामुळे केस निरोगी आणि मऊ होतात. हेअर पॅक तयार करण्यासाठी एक चमचा मधामध्ये कपभर दूध मिक्स करा. हे मिश्रण आपल्या केसांवर लावा. ३० मिनिटांनंतर पॅक सुकल्यानंतर केस हर्बल शॅम्पूने स्वच्छ धुऊन घ्यावेत.

​दही, मध आणि ऑलिव्ह ऑइल हेअर पॅक

दह्यामध्ये प्रोटीन आणि लॅक्टिक अ‍ॅसिड असते. हे घटक आपले केस हायड्रेट ठेवण्याचं काम करतात. याव्यतिरिक्त मध आणि ऑलिव्ह ऑइलमुळे केसांना ओलावा मिळतो. हेअर पॅक तयार करण्यासाठी वाटीमध्ये अर्धा कप दही, तीन - चार मोठे चमचे मध आणि दोन चमचे ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. हे पॅक आपल्या टाळू आणि केसांवर लावा. अर्ध्या तासानंतर केस थंड पाण्याने धुऊन घ्या

​अ‍ॅव्होकाडो आणि मध हेअर पॅक

अ‍ॅव्होकाडोतील घटक आपल्या केसांच्या आरोग्यासाठी पोषक आहेत. या फळामुळे केसांना नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर मिळते. आपल्या केसांचे संरक्षण देखील होते. केसांना अधिक प्रमाणात लाभ मिळण्यासाठी अ‍ॅव्होकाडो आणि मधाचे हेअर पॅक वापरा. यासाठी एक अ‍ॅव्होकाडो घ्या आणि वाटीमध्ये मॅश करा. यानंतर त्यात एक चमचा मध मिक्स करा. हवे असल्यास यामध्ये आपण ऑलिव्ह ऑइल देखील मिक्स करू शकता. तासभरासाठी पॅक केसांवर लावून ठेवा. यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. केसांमध्ये कोंडा असल्यास हेअर पॅकमध्ये एक चमचा लव्हेंडर ऑइल मिक्स करू शकता.

​भोपळा आणि मध हेअर पॅक

भोपळ्यामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ई अधिक प्रमाणात असते. या पोषक घटकांमुळे टाळूच्या भागातील रक्तप्रवाह वाढतो. यामुळे केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. हेअर पॅक तयार करण्यासाठी अर्धा कप भोपळ्याची प्युरी आणि दोन चमचे मध मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर केसांवर लावा आणि शॉवर कॅप घाला. १५ ते २० मिनिटांनं हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या.

NOTE केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नये.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post