मुंबई महापालिकेत काँग्रेसने दिला स्वबळावर नारा



माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हातात आल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी पहिल्याच दिवशी स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २२७ जागा स्वबळावर लढवाव्यात असं कॅप्टन म्हणून माझं मत असल्याचं भाई जगताप म्हणाले. पुणे भेटीदरम्यान जगताप पत्रकारांशी संवाद साधत होते.


मुंबई महापालिकेत एक वेळ होती ज्यावेळी काँग्रेसचे ७५ नगरसेवक होते. मात्र मागील १० वर्षांमध्ये ही संख्या ३० ते ३५ वर आली आहे. ही संख्या वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढणार असल्याचंही भाई जगताप यांनी स्पष्ट केलं. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर भाई जगताप यांनी चंपाषष्ठीनिमीत्त जेजुरी येथील खंडेरायाचं दर्शन घेतलं.


पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या पद्दतीने पार पाडणार असून महापालिका निवडणुकांसाठी मिलींद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, संजय निरुपम या सर्वांना सोबत घेऊन लढणार असल्याचंही जगताप यांनी स्पष्ट केलं. आगामी महापालिका निवडणुकीत अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरण हा मुद्दा राहणार नाही. भाजपाने मेट्रो कारशेडचा मुद्दा राजकीय बनवला असल्याचा घणाघातही जगताप यांनी केला. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर महापालिका निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष काय रणनिती आखतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यातच काँग्रसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा देत नवीन चर्चेला वाट करुन दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post