माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेला आलं आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजकारणापासून दूर गेलेले पार्थ पवार आता राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून दिसण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर पार्थ पवार यांना संधी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार पार्थ पवार पुन्हा संधी देणार का? याकडे राजकीय वर्तुळासह जनतेचही लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर मतदारसंघातील आमदार भारत भालके यांचं आजारपणामुळे काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिकामी झाली असून, कुणाला संधी मिळणार, अशी चर्चा सुरू आहे. त्यात आता या जागेसाठी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू व कर्मवीर औदुंबर पाटील प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमरजित पाटील यांनी केली आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही, तर विकासाचं राजकारण व्हायला हवं. मागील अनेक वर्षांपासून मंगळवेढ्यात ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न, पंढरपूर एमआयडीसी आदी मागण्या प्रलंबित आहेत. त्या पूर्ण न झाल्यानं पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी. पार्थ यांना उमेदवारी दिल्यास अनेक वर्षांचे प्रश्न सुटतील, असं म्हणत अमरजित पाटील यांनी पार्थ पवारांना उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.
पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तेव्हापासून पार्थ पवार राजकारणापासून दूर गेल्याचंच चित्र आहे. बऱ्याच दिवसानंतर त्यांचं नाव पुढे आलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून याबद्दल कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. मात्र, भालके यांच्यानंतर शरद पवार पार्थ पवार यांना संधी देणार की, दुसऱ्याला उमेदवारी देणारं याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
Post a Comment