भाजपला सत्तेपासून दूर ठेवले हेच आमचे सर्वात यश: बाळासाहेब थोरात

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई : 'केंद्र सरकारने तपास यंत्रणांची व्याख्याच बदलून टाकली आहे. सर्वसामान्यांच्या विकासात रस नसलेल्या, कायम दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करीत देशविरोधी कृत्ये करणाऱ्या भाजपला आम्ही तीनही पक्षांनी एकत्रित येऊन सत्तेपासून दूर ठेवले हेच आमचे सर्वांत मोठे यश असल्याचे आम्ही मानतो. कारण यामुळे एकप्रकारे सर्वसामान्य जनतेला, वंचित घटकांना, शेतकरी, कामगार वर्गाला न्याय देण्याची संधी मिळाली आहे', असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

राज्य सरकारला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'सोबत बाळासाहेब थोरात यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी भाजपवर टीका करताना ते म्हणाले, 'विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये नैराश्याची भावना आलेली दिसते. त्यांच्या हातात सत्ता नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये फूट पडू नये यासाठी त्यांना कायम आपली सत्ता येणारच आहे, असे गाजर कार्यकर्त्यांना दाखवावे लागते.' सध्या काँग्रेसचा कठिण काळ असला तरी शाश्वत तत्त्वांशी कोणतीही तडजोड न करता वाटचाल करणाऱ्या काँग्रेसची इतिहासात नोंद होईल, असेही ते म्हणाले. करोना काळातील राज्यातील एकूणच कामाची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली याकडे लक्ष वेधत, याच काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे कामही केल्याचे थोरात यांनी सांगितले.

'महाआघाडीच्या तीनही पक्षांमध्ये आवश्यक तेवढा समन्वय आहे. याआधी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार तसे म्हटल्यास एकाच पक्षाचे होते. मात्र त्यांच्यातही सर्व काही आलबेल होते असे नाही. तीन पक्ष म्हटले की काही प्रश्न असणारच, मात्र आम्ही ते चर्चेने सोडवतो. जनतेला केंद्रस्थानी ठेऊन आम्ही एकजुटीने सरकार चालवतो', असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ' एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post