नारायण राणे यांचा 'तो' गौप्यस्फोट; जयंत पाटील यांनी दिले उघड आव्हान



 माय अहमदनगर वेब टीम

सांगली: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये जाण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीटरच्या माध्यमातून राणे यांचा दावा फेटाळतानाच त्यांना उघड आव्हानच दिले आहे. 'नारायण राणे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जात नाहीत, हे जाणून खेद वाटला', असा टोला लगावतानाच भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी व कुठे चर्चा झाली याचा तपशील कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल, असे प्रत्युत्तर मंत्री पाटील यांनी दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल मोठे वक्तव्य करून नारायण राणे यांनी खळबळ उडवून दिली होती. जयंत पाटील स्वतःच भाजपमध्ये येण्यासाठी भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात होते, असा गौप्यस्फोट राणे यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केला होता. त्याला मंत्री पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ट्वीटरद्वारे राणे यांना उत्तर देताना त्यांनी म्हटले आहे की, 'नारायण राणे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जात नाहीत हे जाणून मला खेद वाटला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी मी कधी, कुठे चर्चा केली याचा तपशील मला कळला तर माझ्याही ज्ञानात भर पडेल. माझ्यापुरते सांगायचे झाले तर, माझी भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी भाजप मध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही, म्हणून हा खुलासा', असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post