माय अहमदनगर वेब टीम
मुंबई: 'भाजपच्या एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्याच मुंबईत येऊन भाजपचे एक मुख्यमंत्री उद्योगपतींशी व कलावंतांशी चर्चा करतात. आपल्या राज्यातील प्रस्तावित फिल्मसिटीबाबत सल्ला घेतात, हा काळाने भाजपवर उगवलेला सूड आहे,' अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या राज्यात फिल्मसिटी उभारण्याची घोषणा केली आहे. यमुनेच्या काठावर या फिल्मसिटीचे काम जोरात सुरू झाले आहे. त्याबाबत सिनेक्षेत्रातील मंडळींशी, निर्माते-दिग्दर्शक व कलाकारांशी चर्चा करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आले आहेत. तोच धागा पकडून शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.
'योगी महाराजांना उत्तर प्रदेशात उद्योगधंदा वाढवायचा आहे. त्यासाठी ते मुंबईत आले. लॉक डाऊन काळात हीच मंडळी मुंबईवर दुगाण्या झाडीत होती. आता त्याच मुंबईत ते आले आहेत. मुंबईचे वैभवच तसे आहे. आज संपूर्ण देशच तसा भिकेला लागला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसीच्या गंगातटी दीपोत्सव साजरा झाला असला तरी लोकांच्या जीवनातले दिवे विझलेलेच आहेत. त्यामुळे मुंबईतले ओरबाडून योगी महाराज लखनौ-नोएडात सोन्याचा धूर कसा काढणार? त्याऐवजी लखनौसाठी एखाद्या द्वारकाधीश श्रीकृष्णाची नेमणूक का करू नये? पण हे द्वारकाधीशही मुंबईतच सापडतात. श्रीकृष्णाने म्हणे त्याचा निष्कांचन मित्र सुदामा याचे मूठभर पोहे खाल्ले आणि त्याच्या बदल्यात सुदाम्याची संपूर्ण नगरीच सोन्याची करून टाकली. अशा श्रीकृष्णाचा शोध घेण्यासाठी योगी महाराज मुंबईत आले. आता त्यांना पोहे कोण खायला घालते ते पाहायला हवे,' असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे.
Post a Comment