माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगरः राज्य सरकारने आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात येताना पोशाखासंबंधी ( dress code ) काही सूचना केल्या आहेत. या ड्रेस कोडची सध्या चर्चा सुरू आहे. आपल्या बिनधास्त बोलण्यासाठी आणि रंगीबेरंगी कपडे परिधान करण्यासाठी ओळखले जाणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ( ramdas athawale ) यांनीही यावर एक मिश्किल टिपणी केली आहे. हा ड्रेस कोड मंत्र्यांनाही लागू झाला तर मला कसं मंत्रालयात जात येईल, असे ट्विट आठवले यांनी केले आहे. अर्थात त्यावर त्यांना अशीच मिश्किल उत्तरे आणि सल्लेही आले आहेत.
राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभागाने एक परित्रक काढून पेहरावासंबंधी सूचना केल्या आहेत. सरकारी कर्मचारी म्हणून शोभेल असाच पेहराव असावा, असे सांगताना भडक रंगाचे, रंगीबेरंगी कपडे नकोत, असेही सूचविले आहे. हाच धागा पकडून आठवले यांनी हे ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटले आहे. ‘राज्य सरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी ड्रेस कोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल?’
अर्थात सरकारने हे नियम फक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी केले आहेत. त्यामध्ये मंत्र्यांचा किंवा अन्य लोकप्रतिनिधींचा समावेश नाही. आठवले यांनी मिश्कीलीच्या आधारे टीका करण्यासाठी हे ट्विट करीत सोबत आपला रंगीत कपड्यांवरील फोटोही शेअर केला आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी त्यांची खिल्ली उडवत विविध सल्लेही दिले आहेत. हा नियम मंत्र्यांना नाही, तुम्ही केंद्रीय मंत्री आहात, राज्यात नाही, विरोध करण्यासाठी राज्यपालांना भेटा असे सल्ले देताना वर्क फ्रॉम होम करा, राजीनामा देऊन टाका असे अतरंगी सल्लेही काहींना त्यांना दिले आहेत. काहींनी त्यांच्या या मिश्किलीचे स्वागत केले आहे. एखाद्या विषयावर मिश्किल भाष्य करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा आठवले यांचा नेहमीच प्रयत्न असतो. तसेच या ड्रेसकोडच्या बाबतीत झाल्याचे दिसून येते.
Post a Comment