माय अहमदनगर वेब टीम
मुंबई: 'काँग्रेस पक्ष सध्या कमकुवत झाला आहे. त्यामुळं आता विरोधकांनी एकत्र येऊन यूपीएला मजबूत करण्याची गरज आहे,' असं परखड मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महाआघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना करून भाजपला धोबीपछाड दिल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यातच सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं काँग्रेसमधील नेतृत्वाचा प्रश्न गंभीर बनला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल खुद्द काँग्रेसमध्येच एकमत नाही. गांधी परिवाराबाहेरील व्यक्तीला नेतृत्व देण्याची मागणी ज्येष्ठांकडून होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर यूपीएच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांचं नाव त्यासाठी पुढं आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं यावर खुलासा करत, ही चर्चा निरर्थक असल्याचं म्हटलं आहे.
या संदर्भात संजय राऊत यांना विचारलं असता एकूणच त्यांनी सध्या परिस्थितीविषयी भाष्य केलं. 'पवार साहेब यूपीएचे अध्यक्ष झाल्यास आम्हाला आनंदच होईल. मात्र, माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यासाठी नकार दिलाय. अधिकृतपणे असा काही प्रस्ताव समोर आला तर आमचा त्यांना पाठिंबाच असेल. कारण, काँग्रेस आता कमकुवत झाली आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी एकत्र येऊन 'यूपीए'ला मजबूत करण्याची गरज आहे,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.
Post a Comment