माय अहमदनगर वेब टीम
अमरावती - अमरावती शिक्षक मतदारसंघात चुरशीच्या लढाईत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी झाले आहेत. सरनाईक यांनी विद्यमान आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांना पराभूत केले असून सरनाईक यांना १५ हजार ६०६ मते तर देशपांडे यांना ९ हजार १९१ मते मिळाली आहेत. विजयासाठी १४ हजार ९१५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.
राज्य विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर, पुणे शिक्षक, मराठवाडा पदवीधर, अमरावती शिक्षक आणि नागपूर पदवीधर या पाच मतदारसंघांत तसेच धुळे नंदुरबार या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत निवडणूक झाली. या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. सहा पैकी चार जागांवर महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजपला धुळे नंदुरबार ही एकमेव जागा जिंकता आली आहे. धुळे नंदुरबारमध्ये काँग्रेसमधून भाजपात गेलेले अमरीश पटेल हेच पुन्हा विजयी झाले आहेत.
नागपूर आणि पुणे पदवीधर हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे भक्कम गड म्हणून ओळखले जायचे. पुण्यात खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पदवीधर मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केलेले आहे. असे असताना महाविकास आघाडीने भाजपचे हे दोन्ही गड सर करत इतिहास रचला आहे. यात शिवसेनेला मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेले प्रा. श्रीकांत देशपांडे यांच्यावर अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी मात केली आहे. अन्य पाच जागांचे निकाल जाहीर झाले तरी अमरावती मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण झाली नव्हती. या मतदारसंघात सरनाईक आणि देशपांडे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. या अटीतटीच्या लढतीत सरनाईक यांनी बाजी मारली आहे.
राष्ट्रवादीच्या बंडखोरीचा देशपांडे यांना फटका
अमरावतीचा निकाल रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. त्यात १५ हजार ६०६ मतांसह सरनाईक यांनी विजयाला गवसणी घातली आहे. प्रा. देशपांडे यांना ९ हजार १९१ मतांपर्यंतच मजल मारता आली. या मतदारसंघात एकूण २९ हजार ८२९ मते वैध ठरली होती. त्यामुळे विजयासाठी १४ हजार ९१५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. तो मॅरेथॉन मतमोजणीनंतर सरनाईक यांनी पूर्ण केला. देशपांडे यांना राष्ट्रवादीचे बंडखोर चंद्रशेखर उर्फ शेखर भोयर यांच्यामुळे फटका बसल्याचे दिसत आहे. भोयर २५व्या फेरीपर्यंत टक्कर देत होते. ते बाद झाल्यानंतर सरनाईक व देशपांडे यांच्यात लढत होती व त्यात सरनाईक यांनी कोटा पूर्ण करत विजय साकारला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावतीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्याने खंत व्यक्ती केली आहे. हा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला असता तर आम्हाला अधिक समाधान मिळाले असते, असे अजित पवार म्हणाले. अमरावतीत आम्ही का जिंकू शकलो नाही, याबाबत विचारविनिमय केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
Post a Comment