यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचा खून; नगरमध्ये घाटात झाला हल्ला

 


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा व राष्ट्रवादी  काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

रेखा जरे पाटील या जतेगाव घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा जरे यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. तसे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. रेखा जरे यांच्याबाबत माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली.

उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे. रेखा जरे, त्यांचा मुलगा, त्यांची आई तसेच डॉ. माने या पुण्याहून काम उरकून येत असताना जतेगाव घाटात ही घटना घडली. कारची काच एका दुचाकीला लागल्यामुळे वाद झाला. त्या वादातूनच रेखा जरे यांच्या मानेवर वार करण्यात आले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती जरे यांच्या मुलाने पोलिसांना दिली आहे. दुचाकीवर दोन जण होते. ते नेमके को होते, याबाबत अधिक तपशील अजून मिळालेला नाही, असे ढुमे यांनी स्पष्ट केले. गाडीला कट मारल्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post