माय अहमदनगर वेब टीम
नगर: राज्यभरात लवकरच होणार असलेल्या विविध स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार का, या प्रश्नाचे ठोस उत्तर अद्याप मिळालेले नाही. तर दुसरीकडे घटक पक्षांतून स्वबळावर या निवडणुका लढविण्याचे भाष्यही केले जाऊ लागले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने राज्य आणि जिल्हा पातळीवर निवडणूक व्यवस्थापन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यस्तरावर तेरा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून जिल्हास्तर समित्याही लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील काही महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती, ग्रामपंचायती यांच्या निवडणुका आगामी काळात होत आहेत. त्यातील काहींचा कार्यक्रमही घोषित झाला आहे. या निवडणुकांच्या पाक्षांतर्गत व्यवस्थापनासाठी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली आहे.
या समितीच्या उपाध्यक्ष पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर आहेत. समन्वयक म्हणून सरचिटणीस ऍड. गणेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय मोहन जोशी, पद्माकर वळवी, तुकाराम रेंगे पाटील, प्रकाश मुगदिया, राजाराम पानगव्हाणे, इब्राहिम भाईजान, महेंद्र घरत, प्रविण देशमुख, नाना गावंडे, रणजीत देशमुख यांचा समावेश करण्यात आला आहे.
समितीमध्ये मोठ्या नेत्यांना स्थान देण्यापेक्षा माजी आमदार आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांचा समावेश केल्याचे दिसून येते. राज्यस्तराप्रमाणेच अशाच समित्या प्रत्येक जिल्हापातळीवरही नियुक्त केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडीतील काँग्रेसची स्थिती, देशपातळीवरील पक्ष नेतृत्वासंबंधी होत असलेल्या चर्चा या पार्श्वभूमिवर पक्षाचा हा निर्णय लक्षवेधक ठरत आहे.
सामूहिक नेतृत्वाची संधी निर्माण करून देत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे समाधान करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. याशिवाय स्थानिक पातळीवर अन्य पक्षांची आघाडी आणि उमेदवारी वाटपाचे कामही याच समित्यांकडून केले जाऊ शकते. संभाव्य नाराजी टाळण्यासाठीही पक्षाने पावले उचलली असून निवडणुकीला अवधी असतानाच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठीही पावले टाकण्यास सुरवात केल्याचे मानले जात आहे.
असे असले तरी काँग्रेसची ध्येयधोरणे आणि कामाची पद्धत पहाता उमेदवारी अगर अन्य निर्णय स्थानिक पातळीवर अभावानेच होतात. मतभेद आणि वाद झालेले निर्णय शेवटी श्रेष्ठींच्या पातळीवरूनच घेतले जातात. अशा परिस्थितीत या व्यवस्थापन समित्यांना काम करावे लागणार आहे.
Post a Comment