अहमदनगर जिल्हा बँकेवर कोणाचा झेंडा ; निवडणुकीत यांचा झाला विजय



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर जिल्हा सहकारी बॅकेच्या चार जागांची मतमोजणी रविवारी झाली. सर्वांचे लक्ष लागलेल्या नगर तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघ या जागेवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले निवडून आले. या शिवाय पारनेर व कर्जत विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून अनुक्रमे उदय शेळके, अंबादास पिसाळ निवडून आले आहेत. तर बिगरशेती संस्था मतदारसंघात प्रशांत गायकवाड विजयी झाले. दरम्यान, बँकेच्या निवडणुकीत या अगोदर सतरा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. बँक पुन्हा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आली आहे. या बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. पुन्हा महाविकास आघाडीचे वर्चस्व बँकेमध्ये पाहायला मिळाले आहे. सर्वाधिक जागा थोरात गटाच्या आल्या आहेत. बँकेच्या अध्यक्षपदासाठी आता नेमकी कोणाची वर्णी लागते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या उपस्थितीमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला. अवघ्या दोन तासांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली.


अपेक्षित निकाल

जिल्हा सहकारी बॅकेच्या नगर विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले 94 मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी सत्यभामा बेरड याना अवघी 15 मते मिळाली. तर पारनेर तालुक्यातून उदय शेळके हे 99 मते मिळवून विजयी झाले व त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रामदास भोसले याना फक्त 6 मते मिळाली.


कर्जतमध्ये चुरस

कर्जत तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघात अखेरपर्यंत चुरस होती. अर्थात कर्जतच्या निवडणुकीतील संघर्ष व चुरस परंपरा यावेळीही कायम राहिली. विजयी उमेदवार अंबादास पिसाळ अवघ्या 1 मताने विजयी झाले. पिसाळ यांना 37 तर पराभूत मीनाक्षी साळुंके यांना 36 मते पडली. 


गुलाल उधळण व फटाक्यांची आतषबाजी

निकालानंतर जिल्हा बॅकेच्या आवारात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. बिगर शेती मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड यांच्या समर्थकांनी एकमेकांवर गुलाल उधळत व फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद साजरा केला. या मतदार संघाची मतमोजणी सुरू असतानाच गायकवाड समर्थकांचा आनंदोत्सव सुरू झाला होता. गायकवाड पहिल्या फेरीअखेर एकशे दहा मतांनी आघाडीवर होते. मतमोजणीनंतर गायकवाड यांना 763 तर दत्ता पानसरे यांना 574 मते मिळाली. बिगरशेती मतदारसंघातून पारनेरचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत गायकवाड हे 189 मतांनी विजयी झाले. गायकवाड हे पहिल्यांदाच जिल्हा बँकेचे संचालक झालेले आहे. या मतदारसंघाच्या निवडणुकीत 4 मते बाद झाली. यापैकी 3 मतपत्रिका कोऱ्या होत्या व एका मतपत्रिकेवर गायकवाड व पानसरे या दोन्ही उमेदवारांच्या नावापुढे शिक्के असल्याने ती मतपत्रिका बाद झाली.



बँकेच्या इतिहासात प्रथमच 17 संचालक बिनविरोध निवडून आले होते. त्यामध्ये बारा संचालक थोरात गटाचे होते. तर उर्वरित विखे गटाचे मानले जात होते. पण प्रत्यक्षात त्यापैकी अवघा 1 संचालक त्यांचा होता व बाकी 4 जण सहमतीचे होते. या निवडणुकीमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला. या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बँकेत सत्तेसाठी सर्वाधिक संधी दिली होती. पाच वर्ष अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्यात आलेले होते. त्यामुळे यंदा अध्यक्षपदासाठी नेमकी कोणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागले आहे. जर काँग्रेसने अध्यक्षपदासाठी दावा केला, तर संगमनेर येथील माधवराव कानवडे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले व राहुल जगताप यांची नावे पुढे येऊ शकतात. 


कर्जतला नेमके काय झाले?

पिसाळ हे विखे समर्थक म्हणून ओळखले जातात. जामखेडमध्येही राळेभात बिनविरोध निवडून आले आहेत. तेही विखे गटाचे मानले जातात. तेथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आमदार रोहित पवार यांनी अर्ज माघारी घ्यायला लावून बेरजेचे राजकारण केलं. परंतु कर्जतमध्ये बिनविरोधची किमया साधता आली नव्हती. त्यामुळे तेथे लढत लागली होती. कर्जतचा इतिहासच तुल्यबल लढतीचा आहे. मागे एकदा दोन उमेदवाराना समान मते पडल्याने त्यावेळी चिठ्ठीवर विजयी उमेदवार निवडला गेला होता, पण यंदा पिसाळ एक मत जास्त मिळवण्यात यशस्वी ठरले.


निवडणूक निकाल :


सेवा संस्था मतदारसंघ 

पारनेर - उदय शेळके (विजयी, मतदान ९९) विरूद्ध रामदास भोसले (६ मते). शेळके 93 मताधिक्याने विजयी.


नगर तालुका - माजी आमदार शिवाजीराव कर्डिले (विजयी ९४ मते) विरूद्ध सत्यभामा बेरड (महाविकास आघाडी १५). कर्डीले 79 मताधिक्याने विजयी.


कर्जत - अंबादास पिसाळ (भाजप विजयी ३७) विरूद्ध मीनाक्षी साळुंके (काँग्रेस ३६ मते). पिसाळ 1 मताने विजयी.


बिगर शेती संस्था - प्रशांत सबाजीराव गायकवाड (राष्ट्रवादी विजयी ७६३) विरूद्ध दत्ता पानसरे (५७४). गायकवाड 189 मताधिक्याने विजयी.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post