माय वेब टीम
अहमदनगर - नगर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम गुरूवारी रात्री उशिरा जाहीर झाला आहे. यात दोन्ही पदासाठी नामनिर्देशन पत्र मंगळवारी (दि.29) दुपारी दीड वाजेपर्यंत करण्यास वेळ दिला असून बुधवारी (दि. 30) ऑनलाईन पद्धतीने मतदान प्रक्रिया होणार असल्याची माहिती नगर सचिव यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.
नगर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी अवघे पाच दिवस राहिले आहेत. या दोन्ही पदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत समजोता झाला असून महापौर पद शिवसेनेसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीकडे उपमहापौर पद राहणार आहे. या प्रक्रियेत काँग्रेसची भूमिका काय राहणार याकडे लक्ष असून ऐनवेळी भाजप काय खेळी करणार याकडे सर्वांचे नजरा असणार आहेत. दरम्यान, निवडणुकीचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती विभागीय आयुक्तांनी केली आहे.
त्यानंतर काल रात्री उशिरा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. नामनिर्देशन पत्र घेणे आणि दाखल करण्यासाठी सोमवारी व मंगळवारी (दि.28 व 29) हे दोन दिवस आहेत. नामनिर्देशनपत्र मंगळवारी (दि.29) दुपारी दीड वाजेपर्यंत दाखल करता येतील. यानंतर दुसर्या दिवशी बुधवारी (दि. 30) सकाळी 11 वाजता महापौर पदाची निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. या आगोदर दाखल नामनिर्देशनपत्रांची छानणी होईल. त्यानंतर नामनिर्देशन पत्र माघारी येण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर उपमहापौर पदासाठी अशीच प्रक्रिया होणार आहे. दरम्यान, नामनिर्देशन पत्र हे महापालिकेतील नगरसचिव कार्यालयामध्ये उपलब्ध होतील, असे नगर सचिव यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
Post a Comment