माय वेब टीम
मुंबई - राज्यातील काही जिल्ह्यांत ‘डेल्टा प्लस’ कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूचा संक्रमण दर अधिक असल्याने तसेच तिसऱ्या लाटेत ५० लाख रुग्ण आढळण्याचा आरोग्य विभागाचा अंदाज असल्याने राज्य सरकारकडून सोमवारपासून (ता. २८) राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्व दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत खुली राहणार असून सायंकाळी ५ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.
५ ते १० टक्के पाॅझिटिव्हिटी दर आणि ४० टक्केच्या वर आॅक्सिजन बेड व्यापण्याच्या आधारे जिल्हा व पालिका क्षेत्राचे दुसऱ्या लाटेदरम्यान ५ स्तर केले होते. त्यात डेल्टा प्लसच्या भीतीने बदल करण्यात आला असून यापुढे ३ ते ५ असे स्तर असतील. परिणामी राज्याच्या ३३ जिल्ह्यांत व सर्व महापालिका क्षेत्रात स्तर ३ चे िनर्बंध लागू होतील.
कोल्हापूर, रत्नागिरी, रायगडात स्तर ४ चे निर्बंध
दुसरी लाट आेसरल्यानंतर पहिल्या स्तरावर असलेल्या जिल्ह्यांतील निर्बंध पूर्ण शिथिल करण्यात आले होते. तर दुसऱ्या स्तराच्या जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी मोकळीक दिली होती. मात्र, नव्या आदेशानुसार ३३ जिल्हे ३ स्तरात आहेत. केवळ रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्हे स्तर ४ मध्ये आहेत.
टास्क फोर्सचा इशारा
राज्याचे प्रशासन कठोर निर्बंध लादण्यास अनुकूल नव्हते. मात्र कोविड टास्क फोर्सने डेल्टा प्लस विषाणूविषयी मुख्यमंत्र्यांना सतर्कतेचा सल्ला दिला. त्यामुळे निर्बंध लागू झाले.
३३ जिल्ह्यांत काय सुरू, काय बंद राहणार
- सायंकाळी ५ नंतर सर्व व्यवहार बंद. संचारबंदी लागू.
- एकल दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील
- माॅल्स, थिएटर्स बंद राहतील.
- उपाहारगृहे, हाॅटेल क्षमतेच्या ५० टक्के ४ पर्यंत सुरू राहतील. शनिवार, रविवार केवळ पार्सल.
- उपनगरीय रेल्वे केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी.
- खासगी कार्यालये ४ पर्यंत, सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेत सुरू राहतील.
- विवाह समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत.
- अंत्यसंस्कार २० लोकांची मर्यादा.
- सलून, जिम ५० टक्के क्षमतेत, पूर्वनोंदणी आवश्यक.
- अत्यावश्यक दुकाने सर्व दिवशी ४ वाजेपर्यंत.
- अत्यावश्यक नसलेली दुकाने शनिवार, रविवार वगळून ४ पर्यंत उघडतील.
- विवाहासाठी ५०, अंत्यविधीसाठी २० ची मर्यादा
आरटीपीसीआर टेस्टनुसारच पॉझिटिव्हिटी रेट काढणार
जालना | यापुढे कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट काढताना अँटिजन चाचण्या गृहीत धरण्यात येणार नाहीत. केवळ आरटीपीअार टेस्टनुसारच पॉझिटिव्हिटी रेट काढणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सोमवारपासून लागू करण्यात आलेले निर्बंध फार साधारण असून ते गरजेचे आहेत. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने मुबलक पुरवठा केल्यास दोन महिन्यात संपूर्ण राज्याचे लसीकरण पूर्ण होऊ शकते. राज्याची दररोज १० ते १५ लाख लसीकरणाची क्षमता अाहे. शनिवारी ७ लाखांपेक्षा अधिक लसीकरण करून विक्रम केला आहे,असे ते म्हणाले.
टास्क फोर्सच्या प्रशासनाला सूचना : ७० टक्के लसीकरण करण्यावर भर द्या
1. पात्र नागरिकांपैकी ७० टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा.
2. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करा.
3. हवेमधून पसरू शकणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी कार्यालयांच्या ठिकाणी हवेशीर वातावरण ठेवा.
4. मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या करा.
Post a Comment