दानवेंच्या कार्यालयाची झडती घाणरे पोलिस निलंबित : केंद्रीय मंत्री दानवेंनी केली होती तक्रार


  माय वेब टीम 

औरंगाबाद - कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी ११ जूनला सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची बेकायदा झाडाझडती घेतली. अशाच प्रकारे पोलिस खात्यात जनमानसात प्रतिमा मलिन होण्यास कारणीभूत होऊन कर्तव्यात बेकायदा व बेशिस्तीचे वर्तन केले, असा ठपका ठेवून पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी चौकशीअंती २ पोलिस उपनिरीक्षक व ३ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. पोलिस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलिस उपनिरीक्षक युवराज पोटरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग सोळंके, पोलिस कॉन्स्टेबल सचिन तिडके, शाबान तडवी अशी त्यांची नावे आहेत.

पीएसआय काकरवाल म्हणाले, ‘भाजप कार्यालयात आरोपी आहे, अशी माहिती मिळाल्याने कार्यालयात गेलो. एकाला बेदम मारहाण झाली होती. मारहाण करणारा एक आरोपी रेकॉर्डवरील आहे. यामुळे संबंधितांच्या कुटुंबीयांनाही धोका होता. तणावग्रस्त वातावरण असल्यामुळे वरिष्ठांना माहिती देण्यास वेळ न मिळाल्यामुळे भाजपच्या कार्यालयात जावे लागले. तिथे कुठेही फायली फेकल्या नाहीत.’

केंद्रीय मंत्री दानवेंनी केली होती तक्रार
कायदेशीर आदेश नसताना पोलिस कार्यालयात घुसून संचिका व इतर साहित्याची नासधूस करणे ही बाब संपूर्णत: बेकायदा आहे. तपासणीत काय साध्य केले, काय निष्पन्न झाले, याचा पोलिस खात्याने तत्काळ खुलासा सादर करावा, अशी लेखी मागणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली होती.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post