माय वेब टीम
मुंबई - सीबीआय आणि ईडी पार्टीचे सदस्य आहेत का असा संतप्त सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला विचारला आहे. सचिन वाझेंच्या पत्रातील आरोपांप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांचीदेखील सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली असून राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून आश्चर्य व्यक्त केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“भाजपाच्या राज्या कार्यकारिणीत सीबीआयचा ठराव झाला त्याचं आश्चर्य वाटतं. त्यांनी सीबीआय आणि ईडी हे त्यांच्या पक्षाचे सदस्य आहेत असं त्यांना वाटत आहे का? आम्ही सांगू तसंच केलं जाईल असं त्यांना वाटत असेल. पण यामध्ये सर्वात जास्त अवमूल्यन सीबीआय आणि ईडीसारख्या संस्थांचं होत आहे हे स्पष्ट दिसत आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“अनिल परब असतील किंवा अजित पवार यांच्यासंदर्भात काही आरोप असतील तर महाराष्ट्रातील तपास यंत्रणा त्या आरोपांची चौकशी करण्यात सक्षम आहे, न्यायालयं आहेत. एखादा तपास सीआयएने वैगेरे करावा असे ठराव करा. किंवा मग आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची भाषा करा. आता हेच बाकी आहे,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. “सरकारला दोन वर्ष होत आली असून यापुढील दोन वर्षही उद्धव ठाकरें यांचंच सरकार चांगल्या पद्धतीने चालणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे यंत्रणांचा वापर करून कोणाला महाराष्ट्रात आपलं सरकार येईल असं कोणाला वाटत असेल तर ते अंधारात चाचपडत आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
Post a Comment