माय वेब टीम
मुंबई - अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने हा आरोप केला असून ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी निवेदन प्रसिद्ध करत आरोप फेटाळले आहेत. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या टीकेला उत्तर दिलं असून सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत असल्याचं म्हटलं आहे.
“मोहन भागवतांनी खुलासा करावा,” राममंदिर जमीन खरेदीतील भ्रष्टाचारावरुन संजय राऊतांचा संताप
अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं आहे. “सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे. ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात आहे हे विसरू नका!,” असा इशाराच त्यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण
लखनौमध्ये ‘आप’चे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन ट्रस्टने जमीनखरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला. दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत १८.५ कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी संजय सिंह यांनी केली. त्याबाबत चंपत राय यांनी निवेदन प्रसृत केले. ‘‘गेले १०० वर्ष आमच्या वर कुठले ना कुठले आरोप झाले आहेत. महात्मा गांधी यांची हत्या केल्याचाही आरोप आमच्यावर केला गेला. अशा कोणत्याही आरोपांची आम्ही पर्वा करत नाही. या नव्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याची शहानिशा करून प्रत्युत्तर दिले जाईल,’’ असे चंपत राय यांनी पत्रकारांना सांगितले.
Post a Comment