नगरात चोरट्यांचा धुमाकूळ ..लाखाचे सोने तर रोख रक्कम लांबविली


 माय वेब टीम 

संगमनेर - तालुक्यातील आश्वी खुर्द येथे गुरुवारी पहाटे धुमाकूळ घालत बंद घरातून सोने, रोख रक्कमेसह इतर वस्तू चोरुन नेले. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात हर्षद विलास बागुल (हल्ली रा. आश्वी खुर्द, मूळ रा. कौठे-मलकापूर, ता. संगमनेर) यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी आश्वी खुर्द येथे भाडेतत्त्वावर राहत असून मी माझ्या खाजगी कामासाठी लहान भाऊ विलास बागुल याच्याकडून त्याची तीन तोळ्याची चेन घेऊन आलो होतो. ती चेन मी घरातील कपाटामध्ये ठेवली होती. त्यामध्ये माझ्या मुलाचे दागिने व काही रक्कम होती. मी घराला कुलूप लाऊन माझ्या मुळ गावी गेलो होतो.

24 जून रोजी सकाळी माझे घराशेजारी राहणार्‍या अशोक शिंदे यांनी मला फोन करून घराला कुलूप लावले नसल्याची माहिती दिली. त्यानंतर माझ्या मित्रानी घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याची माहिती दिल्यामुळे मी घरी येऊन पाहणी केली असता कपाटून तीन तोळे वजनाची 1 लाख 5 हजार रुपये किमतीची चेन, 1 हजार 500 रुपये किमतीच्या बाळ्या, 8 हजार रुपये किमतीच्या दोन लहान अंगठ्या व 5 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 19 हजार 500 रुपयेचा ऐवज चोरीला गेल्याचे दाखल तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 114/2021 नुसार भारतीय दंड संहिता कलम 457, 380 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. बी. भाग्यवान करत आहेत.

आश्वी खुर्द येथे गुरुवारी पहाटे चार ते पाच ठिकाणी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु एक ठिकाण वगळता इतर ठिकाणी त्याच्या हाती काही लागलेले नाही. मध्यरात्री डिपी बंद करून चोरट्यानी चोर्‍या केल्याची चर्चा आश्वी खुर्द येथे सुरू असून याठिकाणी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post