माय वेब टीम
मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जून रोजी २२ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत आघाडी सरकार आणि इतर मुद्द्यांवर पक्षाची भूमिका मांडली. “आमचा मित्रपक्ष काँग्रेस होता, आहे आणि राहिल. मात्र, आता एक नवीन मित्रपक्ष मिळाला आहे, भविष्यात देखील तीन पक्षाचे सरकार राहावे,” असं सांगत २०२४ पर्यंत राष्ट्रवादी पक्ष अधिक भक्कम होईल आणि जास्त लोक निवडून येतील,” असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “२२ वर्षांचा काळ हा चढउतारांचा होता. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांची नेहमीच महत्त्वाची भूमिका होती. २०२४ पर्यंत राष्ट्रवादी पक्ष अधिक भक्कम होईल आणि जास्त लोक निवडून येतील. शरद पवारांचे जुने सहकारी त्यांच्या भागात प्रभावी होते म्हणून त्यांना प्रस्थापित म्हटलं गेलं. पण यातूनच आर. आर. पाटील यांच्यासारखे नेते पुढे आले. शरद पवारांच्या कामाच्या पद्धतीकडे सर्वच नेते आदराने बघतात. अनेक लोक या पक्षात येण्याची इच्छा बाळगतात, मात्र करोनामुळे अडचणी आल्या आहेत,” असं जयंत पाटील म्हणाले.
“राष्ट्रवादी पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अधिक भक्कम होईल आणि जास्त लोक निवडून येतील. कोणत्याही राजकीय पक्षाला मुख्यमंत्रिपदासारखं सर्वोच्च पदाची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे,” असं जयंत पाटील म्हणाले. यावेळी ‘२०२४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा अशी तुमच्या पक्षाची महत्वकांक्षा नाही का?,’ असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले, “घरात बसून कुठल्याही महत्वकांक्षा व्यक्त करणे योग्य नाही. जर पक्ष अधिक चांगला झाला. जनतेनं साथ दिली तर त्यावेळी शरद पवार योग्य निर्णय घेतील. आज पहिलं काम आहे पक्ष सक्षम करणं. महाराष्ट्रातील नागरिकांना जे प्रश्न भेडसावत आहेत, ते सोडवणे, लोकांचं जीवनमान सुधारणं हे आमच्या पक्षाचं ध्येय आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.
पक्ष सोडून गेलेले परत येतील
“भाजपाने अडचणी केल्या म्हणून काही लोक राष्ट्रवादी सोडून गेले. काही लोकांनी दबावापोटी पक्ष सोडला असेल, त्यांनी पक्षात यायला हरकत नाही. आम्हाला बेरजेचं राजकारण करायचं आहे. सोडून गेलेल्यांविषयी आम्हाला आकस नाही. हळूहळू सर्वच नेते परत येतील. राष्ट्रवादीचं कॉंग्रेसमध्ये विलिनीकरणा अशा वावड्या २२ वर्षापासून उठतात. ज्यावेळी राष्ट्रवादी पक्ष वाढायला सुरुवात होते, त्यावेळी काही नतद्रष्ट या वावड्या उठवतात. तसंच पवार साहेबानंतर कोण हे नाव घेऊन पक्षात वितुष्ट निर्माण करायची गरज नाही,” अशी भूमिका पाटील यांनी मांडली.
Post a Comment