माय वेब टीम
मुंबई - काल म्हणजेच २७ जून रोजी नाशिकमधील इगतपुरीतील दोन खासगी बंगल्यांमध्ये सुरू असलेली रेव्ह पार्टी ग्रामीण पोलिस दलाने उद्ध्वस्त केली. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पुढाकार घेऊन मारलेल्या या छाप्यात दहा जणांसह १२ तरुणींना अटक करण्यात आली.
पोलिसांनी अटक केलेल्या बारा तरुणींपैकी पाच ते सहा तरुणी हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमासृष्टीशी संबंधित आहेत. यातील एकीने मराठी बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये सहभाग नोंदवला होता. या अभिनेत्रीचं नाव आता समोर आलं आहे. अभिनेत्री हिना पांचाळ असं तिचं नाव आहे. हीना पांचाळ ही मराठी बिग बॉस दुसऱ्या पर्वातील पहिली वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेली स्पर्धक होती. हिना अभिनेत्री नृत्यांगणा असून ती आयटम साँग साठी प्रसिद्ध आहे.
तसंच अटक केलेल्या दोन तरुणी कोरिओग्राफर म्हणून काम करतात. यातील एक कोरिओग्राफर मूळ इराणची असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन खूपच गाजले. मुंबई पोलिसांसह केंद्रीय पथकाने ड्रग्ज कनेक्शनचे धागेदोरे उघड केले. मात्र, या कारवाईचा फारसा उपयोग झालेला दिसून येत नाही.
संशयितांकडून कोकेन, हुक्का, इतर ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. स्काय ताज व्हिला आणि स्काय लगून व्हिला या खासगी बंगल्यांमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पाटील यांच्यासह पथकाने बंगल्यावर छापा मारला. सर्व संशयित ड्रग्ज घेत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून कोकेन, हुक्का व इतर ड्रग्जसह त्यांची वाहनेही जप्त करण्यात आली.
Post a Comment