माय वेब टीम
हेल्थ डेस्क - एकीकडे देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असली तरी दूसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे एप्रिल महिन्यात जी स्थिती हाताबाहेर जाईल, असे वाटत होते ती आता बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण तरीही नागरिकांनी सावधगिरी बाळगून स्वत:ची जास्तीत जास्त काळजी घेण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये थकवा जाणवण्याची समस्या सामान्यत: दिसू लागली आहे.
अशावेळी आरोग्य मंत्रालयातर्फे या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी नागरिकांनी पौष्टिक आणि संतुलित आहारावर भर द्यायला हवा, असे सांगण्यात आले आहे. नागरिकांच्या हितासाठी आणि ज्या नागरिकांना या कठीण काळात कोणता आहार रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घ्यावा हे समजत नाही आहे, अशांसाठी वेबसाइट MyGovIndia वर 5 आहार शेअर केले आहेत. या आहारांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढून थकवा जाणवणे देखील कमी होते.
पुरेसे पाणी प्या – शरीर या काळात जास्तीत जास्त हायड्रेट ठेवणे गरजेचे असल्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे. पुरेश्या प्रमाणात पाणी पिण्यासोबत घरच्या घरी बनवलेले लिंबू सरबत आणि ताक देखील पिऊ शकता. यामुळे तुमच्या अंगात उत्साह येईल आणि सर्व थकवा पळून जाईल. शिवाय शरीरातील द्रव पदार्थ सुद्धा बाहेर फेकले जातील. एकंदरीत जास्त द्रव पदार्थांच्या सेवनाने शरीर अधिक निरोगी राहते. या शिवाय जाणकारांचे म्हणणे आहे की स्ट्रॉबेरी, रास्बेरी आणि स्थानिक फळे जसे की जांभूळ, करवंद हे खावे. यात पुरेश्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट, व्हिटॅमिन सी, मँगनीज, फॉलेट आणि कॉपर असतात. त्यामुळे यांचा नियमित आहारात समावेश करणे लाभदायकच ठरते.
भिजवलेले बदाम आणि मनुके – कोरोनामुळे होणाऱ्या थकव्यापासून बचाव म्हणून तुम्ही भिजवलेले बदाम आणि मनुके खाऊन आपल्या दिवसाची सुरुवात करू शकता. प्रोटीन बदामामध्ये पुरेश्या प्रमाणात असते आणि मनुके शरीराला मोठ्या प्रमाणात लोह प्रदान करतात. म्हणूनच कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी नियमित बदाम आणि मनुक्याचे सेवन केले पाहिजे. केवळ कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांनीच नव्हे, तर इतर व्यक्तींनी सुद्धा आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी भिजवलेले बदाम आणि मनुके नियमित खावेत.
नाचणी डोसा आणि लापशी – दुसरा महत्त्वाचा आहार म्हणजे नाचणी डोसा आणि लापशी, जो तुमचा थकवा दूर करू शकतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. हा आहार अत्यंत लाभदायक असल्याचे अनेक जाणकार आणि तज्ज्ञांनी देखील सांगितले आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी हा सर्वोत्तम आहार असल्याचे देखील सांगितले जात असल्यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि थकवा अजिबात जाणवत नाही. त्यामुळे जर तुम्ही कोरोनामुक्त झाला असाल आणि तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर हा आहार नक्की घ्या.
रात्रीच्या जेवणात खिचडी खा – कोरोनामुक्त झाल्यावर प्रत्येक रुग्णाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोरोनामुक्त झाल्यावर रात्रीच्या वेळेस जास्त जड अन्न खाऊ नये. त्याऐवजी तुम्ही रात्रीच्या जेवणात खिचडी खाऊ शकता. खिचडीमध्ये सर्व प्रकारचे पोषक तत्व उपलब्ध असतात आणि पोटासाठी खिचडी ही खूप हलकी देखील असते. खिचडी खाण्याचा अजून एक फायदा आहे, जो सर्व सामन्यात: अनेकांना माहित नाही. तो फायदा म्हणजे खिचडी खाल्ल्यामुळे चांगली झोप देखील येते. त्यामुळे रात्रीच्या वेळ जर जास्त जड अन्न खात असाल तर ते थांबवा आणि साधी खिचडी खा.
गुळ आणि तूप – दुपारच्या जेवणात किंवा जेवण झाल्यावर गुळ आणि तूप यांचे सेवन करणे अत्यंत लाभदायक असते. पोषक तत्वांनी भरपूर असणारे हे कॉम्बिनेशन तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता. यामुळे वेगाने रिकव्हर होण्यास देखील मदत मिळते. शरीरातील उष्णता गुळ आणि तूप दोन्ही टिकवून ठेवतात आणि शरीराला उर्जा प्रदान करतात. यात असे अनेक गुण देखील असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात देखील मदत करतात. तर मग जर तुम्हाला गोड खायला आवडत असले, तर गुळ आणि तुपाचा आहारात समावेश नक्की करा आणि निरोगी राहा.
Post a Comment