माय वेब टीम
नवी दिल्ली - कुस्तीपटू सागर राणाच्या हत्येचा तपास करणारे पोलीस सध्या युक्रेनच्या एका महिलेचा शोध घेत आहेत. हत्येमधील मुख्य आरोपी असणारा सुशील कुमार आणि सागर राणा यांच्यात वैर निर्माण होण्यासाठी ही महिला कारणीभूत असल्याची शक्यता आहे. पोलिसांना या महिलेची चौकशी करायची असून सागर राणा आणि सुशील कुमार यांच्यात तसंच त्यांच्या गटात नेमकं कशामुळे फिस्टकलं यासंबंधी महत्वाची माहिती तिच्याकडे असावी असा अंदाज आहे.
पोलिसांकडून सोनू महलची चौकशी केली जाणार होती. पण तो चौकशीसाठी हजर झाला नाही. हत्येच्या रात्री सुशील कुमारकडून सोनू महल आणि अमित यांनाही मारहाण करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सुशील कुमारसोबत अटक करण्यात आलेला अजय कुमार याला ती महिला आवडू लागली होती. अजयने महिलेसोबत सेल्फी घेतल्यानंतर दोन्ही गटांमध्ये पहिला वाद झाला होता.
या महिलेबाबातचं गूढ वाढत असून सुशील कुमारच्या मॉडेल टाऊनमधील फ्लॅटमध्ये वास्तव्यास असणारी महिला सध्या कुठे आहे याबाबत तक्रारदार किंवा संशयित यांच्यापैकी कोणालाही माहिती नाही. ही महिला सागर राणाचे मित्र अमित आणि सोनू महल यांच्या ओळखीची होती. तसंच फरार गँगस्टर काला जठेडी याची नातेवाईक होती.
महिलेसोबच्या सेल्फीवरुन दोन्ही गटात वादाला सुरुवात
सोनू महलने फ्लॅटवर महिलेचा वाढदिवस साजरा केला असताना सुशीलचा जवळचा मित्र अजय याने तिच्यासोबत गैरवर्तन केलं तसंच सेल्फी काढले. यामुळे सोनूचा संताप अनावर झाला आणि त्याने सागरसोबत मिळून आधी अजय आणि नंतर सुशीलसोबत शाब्दिक वाद घातला. सेल्फी घेतल्यामुळे आपला अपमान झाल्यामुळे अजय दुखावला होता. यानंतर त्याने सुशीलला अपमानाचा बदला घेण्यासाठी प्रवृत्त केल्याची माहिती आहे.
Post a Comment