जेट एअरवेज पुन्हा करू शकते उड्डाण, मार्ग मोकळा होण्याची शक्यता


माय वेब टीम 

दोन वर्षांपूर्वी दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर गेलेली जेट एअरवेज पुन्हा उड्डाण करू शकते. सध्या तशी स्थिती निर्माण झाली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) जेट एअरवेजसाठी जालान-कालरॉक कन्सॉर्टियमच्या तोडगा योजनेला सशर्त मंजुरी दिली आहे. मोहम्मद अझमल आणि व्ही. नल्लासेनापती यांच्या अध्यक्षतेखालील एनसीएलटीच्या पीठाने योजना कार्यान्वित करण्यासाठी ९० दिवसांचा अवधी दिला. हा अवधी २२ जूनपासून सुरू होईल. पीठाने तोंडी आदेशात म्हटले आहे की, जर प्रभावी तारीख पुढे वाढवण्याची आवश्यकता असेल तर संबंधित पक्ष ट्रिब्युनलशी पुन्हा संपर्क साधू शकतात. जेट एअरवेजला स्लॉट अलॉट करण्याबाबत ट्रिब्युनलने कुठलेही निर्देश दिले नाहीत. हे प्रकरण सरकार आणि योग्य प्राधिकरण पाहतील, असे याबाबत ट्रिब्युनलने म्हटले. जेट एअरवेजचे पुन्हा परिचालन होण्यासाठी स्लॉट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कंपनीचे स्लॉट इतर एअरलाइन्सला देण्यात आले आहेत.

एप्रिल २०१९ पासून बंद आहे जेटचे परिचालन
दोन दशके परिचालन केल्यानंतर १७ एप्रिल २०१९ पासून जेट एअरवेजची विमाने उभी आहेत. स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील तिच्या कर्जदाता बँकांच्या समूहाला कंपनीकडून ८,००० कोटी रुपयांची वसुली करायची आहे. त्यासाठी त्यांच्यातर्फे जून २०१९ मध्ये कंपनीला दिवाळखोर घोषित करण्याची याचिका दाखल झाली होती. तथापि, ऑक्टोबर २०२० मध्ये कर्जदात्यांनी ब्रिटनच्या कालरॉक कॅपिटल आणि संयुक्त अरब अमिरातीचे व्यावसायिक मुरलीलाल जालान यांच्या कन्सॉर्टियमची तोडगा योजना मंजूर केली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post