नाश्त्यामध्ये ‘हे’ पदार्थ खाताय? शरीरावर होऊ शकतात वाईट परिणाम!


 माय वेब टीम 

हेल्थ डेस्क - नाश्ता हा दिवसाचा सर्वात महत्वाचा आहार मानला जातो. रात्रभराच्या उपवासानंतर आपल्याला सकाळी पटकन काही ना काही खावंसं वाटतं. आपण जे सकाळी सकाळी खातो त्याचा शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्याही परिणाम होतो. सकाळी आपण पौष्टिक पदार्थच खाल्ले पाहिजेत. चुकीच्या पदार्थांची निवड आपल्या पाचन क्रियेसाठी घातक ठरू शकते.

१. लिंबूवर्गीय फळ

संत्री आणि मोसंबी सारखी लिंबूवर्गीय फळं व्हिटॅमिन सी समृद्ध असतात. ही फळं आपल्या त्वचेसाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खूप मदत करतात. पण सकाळी रिकाम्या पोटी ही फळे खाऊ नयेत. रिकाम्या पोटी खाल्यास पोटात अॅसिडीटी होऊ शकते. चिडचिड, छातीत जळजळ सुद्धा जाणवू शकते.

२. कच्च्या भाज्या

आपल्या आहारात कोशिंबीर समाविष्ट करणं कधीही चांगलं. परंतु सकाळी नाश्त्यामध्ये कोशिंबीर किंवा अन्य कच्च्या भाज्या खाऊ नयेत. कच्च्या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचायला जड जाते. सकाळी कच्च्या भाज्या खाल्ल्यास गॅस आणि ओटीपोटातही त्रास होऊ शकतो.

३. प्रोसेस्ड फूड किंवा रेडी टू ईट

सकाळी सकाळी तळलेल्या गोष्टी खाणं टाळा. प्रोसेस्ड फूड किंवा रेडी टू ईट बनवताना हे पदार्थ खूप वेळापर्यंत टिकवण्यासाठी अन्य गोष्टींचा वापर केला जातो. हे पदार्थ घरी आणून तयार करण्यासाठी जास्त तेलाचा वापर करावा लागतो. असे पदार्थ आरोग्यासाठी वाईट आहेत. नगेटस, वेफर्स, फ्रेंच फ्राईज, नूडल्स, पास्ता, सूप असे रेडी टू ईट पदार्थ नाश्त्याला खाणं टाळा.

४. पॅकेज फ्रूट ज्यूस

आपल्या आहारात ताज्या पदार्थांची जागा पॅकेज्ड फूडने घेतली आहे. अगदी फ्रूट ज्यूसचेही पॅक मिळतात. ह्या पॅकेज फ्रूट ज्यूसने अनेकजण दिवसाची सुरुवात करतात. या पॅकेज फ्रूट ज्यूसमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. शिवाय पॅकेज जास्त काळ टिकवण्यासाठी अन्य गोष्टींचा वापर केलेला असतो. त्यामुळे असे फ्रूट ज्यूस प्यायल्यामुळे होणाऱ्या फायद्यापेक्षा तोटाच जास्त आहे. पॅकेज फ्रूट ज्यूसपेक्षा फ्रेश फ्रूटचा ज्यूस नक्की प्या.

५. मैदायुक्त पदार्थ

फास्ट फूडच्या जमान्यात अगदी सकाळ ते रात्रीपर्यंत आपण मैदायुक्त वेगवेगळे पदार्थ चवीने खात असतो. परंतु सकाळच्या नाश्त्याला मैदायुक्त पदार्थ खाणं थांबवलं पाहिजे. सकाळी सर्रास कुकीज, केक्स, पॅनकेक्स, ब्रेड आणि वॉफल्स सारखे पदार्थ खाल्ले जातात. यामध्ये मैद्यासह साखर आणि सॅचुरेटेड फॅट यांचा समावेश असतो. हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले नाहीत. यामुळे वजन वेगाने वाढू लागतं. नाश्त्याला काही लोक नूडल्सला देखील पसंती देतात. नुडल्ससुद्धा मैद्यापासून बनवलेले असतात. त्यामुळे सकाळी नुडल्स खाणे टाळा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post