टि्वटरच्या भारतातील प्रभारी तक्रार अधिकाऱ्याचा राजीनामा; नवीन आयटी नियमांनुसार काही दिवसांपूर्वीच झाली होती नियुक्ती


 माय वेब टीम 

नवी दिल्ली  - केंद्र सरकारच्या नवीन आयटी कायद्यामुळे ट्विटर आण‍ि भारत सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. त्यामुळे ट्व‍िटरच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर टि्वटरचे भारतातील प्रभारी निवासी तक्रार अधिकारी धर्मेंद्र चतूर यांनी राजीनामा दिला आहे. टि्वटरने नुकतीच चतूर यांची या पदावर नियुक्ती केली होती. टि्वटरवर आता त्यांचे नाव दिसत नाही. माहिती तंत्रज्ञान कायदा 2021 नुसार अंतरिम तक्रार अधिकाऱ्याचे नाव झळकवणे अनिवार्य आहे. हा नियम 25 मेपासून लागू करण्यात आला आहे. टि्वटरवर आता भारतातील तक्रार अधिकाऱ्याच्या जागी कंपनीचे नाव, अमेरिकेचा पत्ता आणि ईमेल आयडी दर्शवला जात आहे.

सोशल मीडियासाठीच्या नियमांवरून केंद्र सरकार आणि टि्वटरमध्ये वाद सुरू असतानाच चतूर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने टि्वटरला अंतिम नोटीस धाडली होती. या नोटिसीच्या उत्तरात टि्वटरने म्हटले होते की, आम्ही आयटी नियमांचे पालन करू इच्छितो. कंपनी मुख्य अनुपालन अधिकाऱ्याची माहिती देईल. एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार टि्वटरने मध्यस्थ म्हणून मिळत असलेली सुरक्षितता गमावली आहे. त्यामुळे आता सर्व प्रकारच्या कंटेंटसाठी कंपनी जबाबदार असेल.

नवीन नियमांनुसार नियुक्ती आवश्यक
केंद्र सरकारने 25 मे रोजी जारी केलेल्या नवीन नियमांनुसार सर्व सोशल मीडिया कंपन्यांना आपले वापरकर्ते आण‍ि पीडितांच्या तक्रारी दूर करण्यासाठी एक यंत्रणा तयारी करावी लागत होती. त्‍यानुसार ज्या सोशल मीडियाचे 50 लाखांवर वापरकर्ते आहे त्यांना एका तक्रार अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे होते. त्यासोबतच ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांचे नाव, फोन नंबर आण‍ि संपूर्ण पत्ता आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे लागत होते. विशेष अट म्हणजे नियुक्त करण्यात आलेले अध‍िकारी भारतातच राहणारे असावे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post