अहमदनगर - तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये वाद होऊन ऐकमेकांवर हल्ला झाल्याच्या तीन महिन्यांत दोन घटना घडल्या. यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिवसपाळी अधिकारी यांना पूर्ण वेळ ठाणे अंमलदारांच्या कक्षेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तक्रार दाखल करण्यासाठी येणार्या प्रत्येक नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन पुढील कारवाई करण्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत.
नगर शहरातील महत्त्वाचे व सावेडी उपनगराची जबाबदारी असलेल्या तोफखाना पोलीस ठाण्यात दररोज दाखल होणार्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. पोलीस ठाण्यात येणार्या प्रत्येक नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत फिर्याद दाखल करून घेण्याची जबाबदारी ठाणे अंमलदारावर असते. काही अडचण असल्यास सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकार्यांची नियुक्ती दिवसपाळी अधिकारी म्हणून असते. तसेच रात्र पाळीसाठी एक अधिकारी असतो. एप्रिल महिन्यामध्ये तोफखाना पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी दोघे आले होते.
त्यातील एकाने दुसर्याच्या हातावर ब्लेडने वार केले होते. यामुळे पोलीस ठाण्यात गोंधळ निर्माण झाला होता. खुनाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल आहे. अशीच दुसरी घटना 18 जून रोजी घडली. सराईत गुन्हेगाराने मारहाण केल्याची फिर्याद देण्यासाठी बोल्हेगाव येथील एक कुटुंब तोफखाना पोलीस ठाण्यात आले. त्याच वेळी सराईत गुन्हेगार असलेल्या कुर्हाडे टोळीनेही पोलीस ठाण्यात धाव घेत त्या कुटुंबांवर चाकू, कोयत्योन हल्ला केला. यात तरूण जखमी झाला. याची गंभीर दखल वरिष्ठांनी घेतली आहे. संबंधित हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत.
वाढत्या तक्रारीचे प्रमाण, पोलीस ठाण्यात होणारे हल्ले यामुळे सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यातील एक अधिकारी पूर्णवेळ दिवसपाळी अधिकारी म्हणून ठाणे अंमलदार कक्षात असणार आहे. येणार्या नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत गुन्हा दाखल करण्याची सर्व जबाबदारी त्या अधिकार्यांवर असणार आहे. ड्युटी असेपर्यंत पोलीस ठाणे न सोडण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहे. रात्रपाळी अधिकारी आल्यानंतरच संबंधीत अधिकार्यांना सुट्टी दिली जाणार आहे. यामुळे प्रत्येक नागरिकांच्या तक्रारीचे तात्काळ निरसन होण्यास मदत होणार आहे.
Post a Comment