माय वेब टीम
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये अनेकांनी नेताजी पालकरांना पाहिलं असेल मात्र .नेताजीची ही भूमिका साकारणारा अभिनेता कोण आहे हे अनेकांनी अद्याप ओळखलेलं नाही. तर हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेता कश्यप परुळेकर आहे.
या ऐतिहासिक मालिकेत अभिनेता कश्यप परुळेकर नेतोजी पालकरांची भूमिका साकारणार आहे.
नेतोजी पालकर हे स्वराज्याच्या लढ्यातलं एक महत्त्वपूर्ण नाव. त्यांना प्रतिशिवाजी असं देखिल म्हण्टलं जायचं. स्वराज्याच्या हितासाठी आणि शिवरायांवर असलेल्या निष्ठेपायी त्यांनी शत्रुच्या गोठात राहणं देखिल स्वीकारलं. अश्या या शूरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे अशी प्रतिक्रिया अभिनेता कश्यप परुळेकर याने व्यक्त केली. या मालिकेत कश्यप एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
स्टार प्रवाहच्या या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगतान कश्यप म्हणाला, ‘स्टार प्रवाहसोबत खूप जुनं नातं आहे. अगदी मन उधाण वाऱ्याचे मालिकेपासून सुरु झालेला हा प्रवास अविरत सुरुच आहे. या मालिकेसाठी जेव्हा विचारणा झाली तेव्हा मी लगेच होकार दिला. एकतर मालिकेची कल्पनाच फार वेगळी आहे. शिवरायांच्या शिलेदारांची गोष्ट मालिकेतून भेटीला येणार आहे. त्यामुळे नेतोजी पालकर साकारणं माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे.” असं कश्यप म्हणाला.
या आधीदेखील कश्यपने एका ऐतिहासिक सिनेमात काम केलंय. त्यामुळे तलवारबाजी आणि घोडेस्वारी याचं प्रशिक्षण त्याने आधीच घेतलं होतं. याचा फायदा नेताजी पालकर साकारताना होत असल्याचं तो म्हणाला. पुढे तो म्हणाला, “या भूमिकेसाठी लागणारा फिटनेस, एनर्जी, लवचिकता यावर मी मेहनत घेतोच आहे. सोबतच भाषेवरही मी विशेष लक्ष देतो आहे. नेतोजी साकारण्यासाठी घाटावरची भाषा आणि त्या भाषेचा लहेजा आत्मसात करतो आहे. एक अभिनेता म्हणून या भूमिकेतून मी संपन्न होतोय असं म्हण्टलं तरी चालेल.” असं म्हणत कश्यपने या मालिकेचा एक भाग होता आलं याबद्दल आनंद व्यक्त केलाय.
Post a Comment