माय वेब टीम
मुंबई - मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असली तरीदेखील मुंबई (mumbai guidline) सध्या लेव्हल-३मध्ये असून तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध लागू असतील. रुग्णसंख्या पुन्हा वाढू नये यासाठी मुंबई महानगरपालिका सावध पावलं उचलत आहेत. मुंबई लोकलबाबतही महापालिकेनं आस्ते कदम पुढे जाण्याचे धोरण कायम ठेवले आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तरीदेखील बोगस ओळखपत्राच्या सहाय्याने अनेक मुंबईकर प्रवास करताना दिसत आहे. यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई लोकलची दारे सर्वसामान्यांसाठी बंद असली तरीही बोगस ओळखपत्र तयार करुन प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळं लोकलमधील गर्दीचे प्रमाण वाढले आहे. ही गर्दी टाळण्यासाठी सरकारने क्यूआर कोड असलेल्या पासची सिस्टिम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास असं या सिस्टिमचं नाव असून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच क्युआर कोडचा पास दिला जाणार आहे.
क्युआर कोड असलेले युनिवर्सल आयकार्ड अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. कर्मचाऱ्यांकडे हे ओळखपत्र असेल तरच त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश मिळणार आहे. तसंच, क्युआर कोड असलेले पास स्मार्टफोन किंवा क्युआर रिडर मशीनद्वारे तपासण्यात येणार आहेत. त्यामुळं ते पास बनावट आहेत का हे ओळखण्यास मदत होणार आहे. क्युआर कोड सिस्टिममुळं बोगस ओळखपत्रावरुन प्रवास करणाऱ्यांना चाप बसणार आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्युआर कोड असलेला पास मिळाला की रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवरुन त्यांना पास व तिकीट मिळू शकते. याबाबतीत राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेच्या महासंचालकांना पत्र दिलं आहे. मात्र, क्यु-आर कोड सिस्टिम कधीपर्यंत लागू होईल याबाबत अद्याप माहिती समोर आली नाहीये.
Post a Comment