माय वेब टीम
मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून छापेमारी केली जात आहे. सकाळपासून ही छापेमारी केली जात आहे. दरम्यान देशमुखांच्या खासगी सचिवालाही ईडीकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान राजकीय नेत्यांच्या याविषयी विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून अनिल देशमुखांवर ही कारवाई केली जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.
याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, 'केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून ही कारवाई केली जात आहे. आम्हाला त्याची यत्किंचितही चिंता वाटत नाही.' तसेच पुढे ते म्हणाले की, 'आम्हाला ईडी वगैरे काही नवीन नाहीत. अनिल देशमुख हे काय पहिले नाहीत. अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी दाखवलेला आहे. या चौकशीची आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही.
यापूर्वीही अनिल देशमुखांवर केंद्र सरकारच्या यंत्रणांकडून कारवाई करण्यात आली होती. यामधून त्यांना काय मिळाले माहिती नाही. मला वाटते त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. आता त्या नैराश्यातूनच अजून कुठून त्रास देता येईल का? या विचारातून हा त्रास देण्याचा हा प्रयत्न सुरू आहेत' असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.
Post a Comment