मुंबई - कोरोना काळात रखडलेली ३ हजार ६४ प्राध्यापकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्या वतीने २१ जून २०२१ पासून विविध मागण्यांच्या संदर्भात उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत होते. उच्चस्तरीय समितीच्या वतीने एकूण ४ हजार ७४ प्राध्यापक भरतीस मान्यता देण्यात आली होती.
त्यापैकी १ हजार ६७४ प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती पूर्ण करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या काळात थांबलेली ३ हजार ६४ प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन सामंत यांनी दिले. या निर्णयाचे स्वागत करून नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत असलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मागणीच्या अनुषंगाने ४८ मिनिटांची तासिका याप्रमाणे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच १२१ ग्रंथपाल भरती तसेच विद्यापीठातील शिक्षकीय ६५९ भरती करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाने सोमवार, २८ जून रोजीचे नियोजित आंदोलन स्थगित केले आहे.
Post a Comment