माय वेब टीम
मुंबई - काँग्रेसचा स्वबळाचा नारा, आघाडीच्या नेत्यांच्या सुरू असलेल्या चौकशा, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे सरकारची झालेली कोंडी आदी पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मंगळवारी गुप्त बैठक झाल्याचे समजते.
दरम्यान, महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे सातत्याने समोर येत आहेत. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता गुप्त बैठकीची नवी माहिती समोर आली आहे. सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांच्या हालचाली सुरू आहेत. या बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीला केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मोजकेच नेते उपस्थित होते. या बैठकीचं ठिकाण अत्यंत गुप्त ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे या बैठकीची कुणालाही माहिती नव्हती. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली असून पुढील रणनीती ठरवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
विशेष म्हणजे या गुप्त बैठकीला काँग्रेसचा एकही नेता नव्हता. आधीपासूनच सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने वर्चस्व ठेवलं आहे. अनेक महत्त्वाच्या निर्णयातून काँग्रेसला डावललं आहे. त्यात आता या बैठकीपासूनही काँग्रेसला दूर ठेवल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नेमकी काय खिचडी शिजतेय? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडी करूनच लढण्याची चर्चा या बैठकीत झाल्याचं बोललं जात आहे. तसेच उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण होऊ शकतं. राज्य सरकारला दगाफटका करण्याचं काम होऊ शकतं, त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
स्वबळामुळे चलबिचल?
काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सातत्याने काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढेल अशी वक्तव्ये केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत चलबिचल असल्याचं दिसतं. त्यातच संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर ते शरद पवारांच्या भेटीला गेले होते. याशिवाय दोन दिवसांपूर्वी शरद पवार स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेले होते.
Post a Comment