संगमनेर - शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यामधील जनावरांचे मांसाचे तुकडे व इतर प्रकारची घाण खुलेआम प्रवरा नदीपात्रात टाकण्यात येत आहे. यामुळे पिण्याचे पाणी दूषित होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संगमनेर नगरपालिका प्रशासन व पोलिसांचेही दुर्लक्ष होताना दिसत आहे.
राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरात मात्र खुलेआम गायांची कत्तल केली जात आहे. शहरातील जमजम कॉलनी, कोल्हेवाडी रोड आदी परिसरात खुलेआम कत्तलखाने सुरू आहेत. या कत्तलखान्यामधून दररोज अनेक जनावरांची कत्तल केली जात आहे. पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करूनही कत्तलखाने सुरू असतात.
या कत्तलखान्यातील मांंस मुंबई व ठाणे येथे पाठविले जाते. यातून कत्तलखाना चालकांना लाखो रुपयांची कमाई होत आहे. संगमनेर शहरात सुरु असलेल्या कत्तलखान्यातील घाणीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या घाणीमुळे मोठ्या प्रमाणावर डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कत्तलखान्यातील घाण, जनावरांचे मासचे तुकडे, अवयव एका गाडीत भरुन नदीपात्रात टाकण्यात येत आहे. यामुळे नदीपात्र जवळ कुत्र्यांची संख्या वाढली आहे.
घाण मिस्त्रीत रक्तही नदीपात्रात टाकण्यात येत आहे. हे पाणी हजारो नागरिक पितात हे माहिती असूनही कत्तलखाना चालक नदीपात्रात घाण टाकत आहे. संगमनेर शहरातील प्रवरा नदी पुला पासून काही अंतरावर ही घाण टाकण्यात येते. नदीला पाणी असल्यानंतर ही घाण वाहून जाते, त्यामुळे त्याचे गांभीर्य समजत नाही. मात्र नदीला पाणी नसल्यावर या घाणीचा प्रादुर्भाव जाणवत असतो. गेल्या काही दिवसांपासून जनावरांची घाण व अवयव निदर्शनास येत आहे असे असतानाही नगरपालिका व पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
प्रवरा नदीपात्रातून अनेक गावांमध्ये जलवाहिनीद्वारे पाणी पुरविले जाते हे घाण पाणी संबंधित विहिरी मध्ये जाते आणि तेच पाणी अनेक नागरिकांच्या वापरात व पिण्यात येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. नगरपालिका प्रशासनाने त्वरीत याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
Post a Comment