माय वेब टीम
कोपरगाव - कुर्हाडीचा घाव घालून तरुणाचा खून करून मृतदेह नाशिक जिल्ह्यातील जंगलात फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघड झाली असून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
महेश सोन्याबापू मलिक रा. कासली, ता. कोपरगाव असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुण महेश मलिक याच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून पढेगाव येथील चेतन आसने काम करत होता. त्याचे मयत महेश मलिक यांच्या घरी नेहमी येणे जाणे होते. त्यातून मयताची पत्नी व ट्रॅक्टरचा चालक आसने याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यातून या दोघांचा बेबनाव निर्माण झाला होता. त्या घटनेनंतर चेतन आसने हा नाशिक कडे पसार झाला होता. चेतन घरी आलेला आहे. याची खबर मिळाल्यानंतर जाब विचारण्यासाठी महेश मलिक चेतनच्या घरी गेला. त्यांच्यात बाचाबाची होऊन आरोपी चेतन बापू आसने व त्याचा भाऊ केशव बापू आसने यांनी कुर्हाडीचा घाव घालून महेश मलिक याचा खून केला.
या घटनेनंतर आरोपीने महिंद्रा पीकअपमधून मृतदेह घेऊन त्र्यंबकच्या पुढे असलेल्या म्हसरुळच्या जंगलात फेकून दिला. या घटनेनेनंतर मयत तरुणाच्या आई सुनीता सोन्याबापू मलिक हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सुनेवर आरोपी चेतन आसने याची वाईट नजर होती. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकले होते. त्याचा राग मनात धरून वरील दोन आरोपींनी त्यास मारहाण करून त्याचे पिकअप गाडीतून अपहरण केले आहे.
या फिर्यादीवरून पोलिसांनी भा.दं.वि.कलम 364,323,34 प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपींच्या मोबाईल लोकेशनवरून त्यांचा शोध घेऊन रात्री अटक केली. आरोपीला पोलिसी हिसका दखवताच त्याने मृतदेह म्हसरुळच्या जंगलात टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी या जंगलात जावून मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड करीत आहेत.
Post a Comment