माय वेब टीम
अलिबाग - उरण मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं आज सकाळी निधन झालं आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते. मधुकर ठाकूर हे अलिबागमधील उरण मतदारसंघाचे माजी आमदार राहिले आहेत. मागील 3 ते 4 वर्षांपासून ते सतत आजारी होते. त्यानंतर आज सकाळी त्यांना देवाज्ञा झाली.
2004 ते 2009 या काळात अलिबाग – उरण मतदार संघाचे ते आमदार होते. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी दमदार विजय मिळवला होता. मधुकर ठाकुर यांनी 2004 मध्ये शेकापच्या तत्कालीन राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर ते सर्वत्र चर्चेत राहिले होते. अलिगडमध्ये शेकापंची असलेली 32 वर्षांची मत्तेदारी त्यांनी मोडीत काढली होती. झिरास ग्रामपंचायतीचे सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकिय प्रवास होता.
मधुकर ठाकूर यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. आमदार असताना माजी मुख्यमंत्री विल्लसराव देशमुख, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांचे सोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
दरम्यान, अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या जाण्यानं रायगड काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मधुकर ठाकूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Post a Comment