‘…अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू’; खासदार संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा



माय वेब टीम  

मुंबई - सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षण रद्द करण्याबाबत निर्णय दिला होता. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये पहिल्या मूक आंदोलनाला सुरुवात झाली. मराठा आरक्षणाला लोकप्रतिनिधींचं समर्थन पाहता मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांना चर्चेने प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती. त्यानंतर मराठा क्रांती मुक आंदोलन पुढं ढकलला होता. आता सरकारला दिलेला हा कालावधी संपत आला आहे. त्यानंतर आता संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कालावधी मागितला होता. हा एक महिन्याचा अवधी संपत आला असून राज्य शासनाने बैठकीत घेतलेल्या निर्णयांची पूर्तता व अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केल्याचं दिसून येत नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. राज्य शासनाने समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य जरी केल्या असल्या, तरी प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असंही संभाजीराजे यांनी पत्रातून म्हटलंय.


मराठा समाजास शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या काही मागण्या समाजामार्फत आम्ही राज्य शासनाकडे मांडल्या होत्या. मराठा समाजाच्या हिताकरिता या मागण्या केल्या होत्या. समाजास वेठीस न धरता थेट लोकप्रतिनिधींची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही मूक आंदोलनाचा पर्याय निवडला होता. पण शासनाच्या विनंतीनुसार आम्ही नियोजित मूक आंदोलन एक महिना पुढं ढकलला होतं, याची आठवण संभाजीराजे यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे.

दरम्यान, संबंधित सर्व प्रशासकीय विभागांकडून मागण्यांबाबत झालेल्या निर्णयांचा कार्य अहवाल त्वरीत मागवून या मागण्या मार्गी लावून त्यांची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू, असा इशाराही खासदार संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post