मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांना नुकतीच कोरोना लागण झाल्याची माहिती समोर आली होती. गेल्या दोन दिवसांपासून कोरोना सदृश लक्षणे दिसत असल्यानं त्यांनी कोरोनाची टेस्ट केली. त्यात त्यांचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. अमोल कोल्हेंनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस घेतले आहेत.
महाराष्ट्र शासनाची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सक्षम असून यावर माझा विश्वास आहे. म्हणूनच कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर शासकीय रुग्णालयाचा पर्याय निवडला. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या ‘सेव्हेन हिल्स रुग्णालयात’ उपचारासाठी दाखल झालो आहे, अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
लस घेतली म्हणजे धोका टळला असे समजून गाफिल राहू नका. लस घेतली म्हणून कोरोना होणार नाही हा गैरसमज आहे. सर्वांनी कोरोनाचे नियम निर्बंध काटेकोरपणे पाळा, असा सल्ला देखील अमोल कोल्हे यांनी दिला आहे.
दरम्यान, आपण आपल्या व्यवस्थांवर विश्वास दाखवला पाहिजे. दोनवेळा कोरोना प्रतिबंधक लस घेऊन सुद्धा माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही याची प्रचिती मला आलेली आहे. हा डेल्टा व्हेरीएंट असू शकतो. कारण तो लस घेतल्यानंतरची प्रतिकारशक्ती सुद्धा भेदू शकतो, असं म्हणत कोल्हेंनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
Post a Comment