सलमान खानसोबत मोठ्या पडदयावर झळकलेल्या अभिनेत्री सुनीता शिरोळे यांनी अलीकडेच एका मुलाखतीत त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्याचा खुलासा केला आहे. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक बचतीवर दिवस काढले, पण आता सर्व जमापुंजी संपली असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. सुनीता शिरोळे या 85 वर्षांच्या आहेत. कमी झालेले काम, आजारपण आणि वाढता वैद्यकीय खर्च यामुळे त्यांना उदर्निवाह करणे कठीण झाले आहे.
लॉकडाऊन सुरु होईपर्यंत काम करत होत्या सुनीता
सुनीता सांगतात, 'कोरोनाची साथ येईपर्यंत मी काम करत होते. लॉकडाऊनच्या काळात मी माझ्या आर्थिक बचतीवर दिवस काढले आहेत. पण त्याच वेळी दुर्दैवाने मला मूत्रपिंड संसर्ग आणि गुडघेदुखीच्या तीव्र वेदनांमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयात असताना मी दोनदा पडले आणि माझा डावा पाय फ्रॅक्चर झाला. तो आता मी वाकवू शकत नाही. यापूर्वी माझी अँजिओप्लास्टी झाली आहे. तसेच मी इतर आजारांशीही लढते आहे.'
नुपूर अंलकारच्या घरी राहत आहेत सुनीता
सध्या सुनीता अभिनेत्री नुपूर अलंकार यांच्या घरी राहत आहे. याविषयी त्या सांगतात, 'मी एका फ्लॅटमध्ये पेइंगगेस्ट म्हणून राहत होते. पण पैसे नसल्यामुळे तीन महिने मी भाडे देऊ शकले नाही. मी CINTAA (सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन)ची मनापासून आभारी आहे. कारण त्यांनी नुपूर यांना माझ्या मदतीसाठी पाठवले. त्या मला घरी घेऊन आल्या. त्यांनी माझी काळजी घेण्यासाठी एक नर्सचीही नियुक्ती केली आहे.'
जगणे कठीण होत चालले आहे
सुनीता पुन्हा काम सुरु करण्याबाबत म्हणतात, 'मला पुन्हा काम सुरु करायचे आहे. कारण मला पैशांची खूप गरज आहे. पण पायांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. मी पुन्हा कधी पुर्वीसारखी नीट चालू शकेल हे मला माहित नाही. माझे चलतीचे दिवस असताना मी खूप पैसा कमावला आहे, गरजूंना मदतही केली आहे. मी कधीच असा विचारही केला नव्हता की माझ्यावर असे कठीण प्रसंग येतील. माझ्या कमाईचा मोठा हिस्सा माझे पती आणि मी उभारलेल्या व्यवसायात गुंतवला होता. पण गोदामाला लागलेल्या आगीमुळे आमचे प्रचंड नुकसान झाले. आम्ही आमचे सर्व काही गमावले. त्यांचे 2003 मध्ये निधन झाले. आज मी दुनियेच्या मेहरबानीवर जगते आहे. माझ्यासाठी सध्या जगणेही कठीण झाले आहे.'
'बजरंगी भाईजान'मध्ये झळकल्या होत्या सुनीता
सुनीता यांनी 'बजरंगी भाईजान', 'छोट-अज इस्को', 'कल तेरे को', 'किसना: द वॉरियर पोएट', 'शापित', 'द लीजेंड ऑफ भगत सिंह', आणि 'मेड इन चाइना' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासह 'किस देश में है मेरा दिल', 'मिसेज कौशिक की पांच बहुएं' या टीव्ही शोजमध्येही त्या झळकल्या.
Post a Comment