हाडांची समस्या आहे? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश


 हेल्थ डेस्क | आपल्या हाडांचं आरोग्य राखणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण, हाडं ही आपल्या शरीराचा आकार, रचना आणि भक्कम आधार देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरतात. हाडांच्या दुरावस्थेमुळे ऑस्टियोपोरोसिस, रिकेट्स, हाडांचा कर्करोग, हाडांमध्ये इन्फेक्शन आणि पेजेट रोग यांसारख्या अनेक आरोग्यविषयक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. दरम्यान, या सर्व समस्या टाळायच्या असतील तर शरीरासाठी पूरक संतुलित आहार घेणं, जीवनशैलीत सकारात्मक बदल करणं आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणं यांसारख्या गोष्टी सातत्याने पाळायला हव्यात. ज्यामुळे, आपण आपल्या हाडांचं आरोग्य वाढवू शकतो. आपल्या शरीरामध्ये साधारणत: १ किलोपर्यंत कॅल्शिअम आढळून येत. तर यापैकी तब्बल कॅल्शिअम ९९ टक्के हाडांमध्ये असतं. त्यामुळे, आपल्या हाडांच्या आरोग्याचा विचार करताना कॅल्शिअमचं प्रमाण सर्वाधिक महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच, आज आपण विशेषतः हाडांच्या आरोग्यसाठी आपल्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश हितकारक ठरू शकतो? याबाबत जाणून घेणार आहोत.

ड्राय फ्रुट्स

मूठभर ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने हाडांच्या आरोग्यासह आपलं सर्वांगीण आरोग्य सुधारण्यास मदत होते. तुम्ही अर्थात यासाठी विविध प्रकारच्या ड्रायफ्रुट्सचा तुमच्या दररोजच्या खाण्यात समावेश करू शकता. उदा. अक्रोड, पेकान, बदाम आणि ब्राझील नट्स इत्यादी. हे सर्व ड्रायफ्रुट्स कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा -३ फॅटी अ‍ॅसिड आणि फॉस्फरस यांसारख्या घटकांनी समृद्ध असतात. हेच सर्व पोषक घटक हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात.

सॅल्मन

सॅल्मनसारखे चरबीयुक्त मासे हेल्थी फॅट्स आणि ओमेगा -३ फॅटी अ‍ॅसिडनी समृद्ध असतात. त्यांच्या सेवनाने आपल्या शरीराला आवश्यक असलेलं व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. यांत असलेले ओमेगा ३ आणि व्हिटॅमिन डी हे दोन्ही घटक हाडांचं आरोग्य वाढवण्यास आणि विकास करण्यास मदत करतात. म्हणून हे आपल्या आहारात समाविष्ट करणं आवश्यक आहे.

दूध

दूध हे सुपरफूड मानलं जातं, हे आपल्याला सर्वांना माहिती आहेच. दूध हे कॅल्शियमने समृद्ध आहे पेय आहे जे हाडांचं आरोग्य वाढविण्यासाठी एक परिपूर्ण ठरतं. आपण आपल्या ब्रेकफास्टचा एक भाग म्हणून स्मूदीज, ओट्ससोबत दुधाचा समावेश करू शकतो. याशिवाय नुसतंच एक ग्लास दूध देखील आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतं.

अंडी

अंडी हा अगदी स्वस्त आणि मस्त पर्याय. अंड्याला पोषक घटकांचं पॉवरहाऊस म्हणतात. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं असतात. शरीरातील लो-लेव्हल प्रोटीन हाडांच्या वाढीस अडथळा आणू शकतात. म्हणूनच अंड्यामार्फत आपण आपल्या आहारात अगदी सोप्या मार्गाने काही हेल्थी प्रोटीन समाविष्ट करू शातो. आपण अंड उकडून किंवा ऑमलेट अशा कोणत्याही स्वरूपात खाऊ शकतो.

पालक

पालकामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन के असतं. ते हाडांचं आरोग्य राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश असणं केवळ हाडांचंच नव्हे तर आपलं संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाचा असतो.  म्हणूनच आपल्या आहारात भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आवर्जून करा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post