सोया मिल्क, ओट मिल्कनंतर ‘बटाट्याचं दूध’ ठरणार दुधाला नवा पर्याय? जाणून घ्या फायदे


हेल्थ डेस्क | दूध हा संतुलित आहाराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपण दुधाचं सेवन करतच असतो. रात्री नुसतं ग्लासभर दूध, हळदीचं दूध, विविध प्रकारची मिठाई, दररोजच्या चहा किंवा कॉफीमध्ये समावेश, यांसह विविध पदार्थांमध्ये दुधाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण बऱ्याच जणांना दूध आवडत देखील नाही. डाएटची बंधनं, दुधाची ऍलर्जी, आवडी-निवडी यामुळे अनेक जण दूध पिणं टाळतात आणि अन्य पर्यायांचा आपल्या आहारात समावेश करतात. उदा. सोया मिल्क, आल्मन्ड मिल्क, ओट मिल्क, कॅश्यू मिल्क असे अनेक पर्याय आपल्याकडे सध्या उपलबध आहेत. याच यादीत आता आणखी एकाची भर पडली आहे ते म्हणजे बटाट्याचं दूध. जाणून घेऊया, हे दूध कसं बनवलं जातं आणि आपल्या शरीराला त्याचे काय फायदे आहेत?

स्वीडिश कंपनी व्हेज ऑफ लंडने ब्रँड डीयूजीने सर्वात आधी बटाट्याचं दूध हा पर्याय उपल्बध करून दिला आणि सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस ओलँडर म्हणाले की, बटाट्यापासून बनवलं जाणारं हे पेय ‘अतिशय टिकाऊ’ आहे. तसेच इतर दुधापेक्षा बटाट्याचं  दूध तयार करण्यासाठी खूप कमी संसाधने लागतात. त्यांनी पुढे दावा केला की, ‘बटाटयाच्या दुधाच्या उत्पादनासाठी ओट दुधापेक्षा अर्धी जमीन आणि बदामाच्या दुधापेक्षा ५६ पट कमी जमीन’ आवश्यक आहे. न्यूट्रिशनिस्ट आरोशी अग्रवाल यांनी सांगितलं की, बटाट्याच्या दुधाचं उत्पादन करणारी ही पहिली कंपनी नाही. याची पहिली कंपनी ही २०१५ मध्ये कॅनडा आणि अमेरिकेतील एका वेगन ब्रँडने सुरू केली होती.

न्यूट्रिशनिस्ट म्हणतात कि, “दुग्धजन्य पदार्थांना पर्यायांची मागणी वाढत आहे. म्हणूनचं विविध प्रयोग सुरु झाले आहेत. त्यात या नव्या पर्यायाचं कौतुक आहे. कारण, बटाट्याचं दूध केवळ सोया-मुक्त, ग्लूटेन-मुक्त आणि साखर-मुक्त नाही तर दूधासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. कारण हे दुग्ध आपल्या साध्या दुधासारखंच आहे.”

बटाट्याचं दूध कसं बनवलं जातं?

“बटाट्याचं दूध बनवण्यासाठी बटाटे गरम करून आणि पाण्यात उकळून आणि त्यानंतर रेपसीड तेल आणि कॅल्शियमसाठी इतर पदार्थ, मटार प्रथिने आणि चिकोरी फायबर घालून एक स्मूथ (फेसाळ) मिश्रण बनवलं जातं. त्यानंतर विविध जीवनसत्त्वे आणि खनिजांसह औद्योगिकदृष्ट्या मजबूत केलं जातं”, असं अग्रवाल यांनी सांगितलं.

बटाट्याच्या दुधाचे फायदे

आतापर्यंत आपल्या नेहमीच्या आहारात विविध मार्गानी बटाट्याचा वापर होतच होता. पण आता त्यापासून बनवलेलं गेलेलं एक पेय दुधाला पर्याय ठरणार आहे.

न्यूट्रिशनिस्ट अग्रवाल यांनी यांनी इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमशी बोलताना पुढे सांगितलं कि, बटाट्याचं दूध हे व्हिटॅमिन डी आणि बी १२ चा चांगला स्रोत आहे. ते व्हिटॅमिन ए, सी, डी, ई आणि के तसेच व्हिटॅमिन बी यांसह कॅल्शियम आणि लोह यासह इतर महत्वाची जीवनसत्त्व आणि खनिजांनी परिपूर्ण आहे.” तसेच “बटाट्याचं दूध हे अतिशय टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल आहे. कारण त्याच्या उत्पादनात कमी प्रमाणात पाणी आणि जमीन आवश्यक आहे,” असेही त्यांनी पुढे नमूद केलं.

बटाट्याच्या दुधाचं सेवन करताना न्यूट्रिशनिस्ट अग्रवाल यांनी एक महत्त्वाचा सल्ला देखील दिला आहे. “मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि अपचनाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हे दूध एक चांगला पर्याय ठरेल किंवा नाही याबाबत कोणताही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे, या व्यक्तींनी शक्यतो बटाटयाच्या दुधाचं सेवन टाळावं” त्याचप्रमाणे त्या पुढे म्हणाल्या कि, “बटाटे हा प्रथिनांचा चांगला स्त्रोत नाही. त्यामुळे, घरी बनवलेल्या बटाट्याच्या दुधामध्ये प्रथिने आणि इतर पोषक घटकांची कमतरता असते.”

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post