अहमदनगर |सोमवारी रात्रीपासून नगर शहरासह, उपनगर व तालुक्यातील अनेक भागाला पावसाने झोडपून काढले आहे. सीना नदीला पूर आल्याने नगर-कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली होती. सीनाकाठच्या वस्त्यांमध्ये घरात पाणी शिरले होते. नगर शहरातील नालेगाव, सावेडी, नागापूर या महसूल मंडलांत दमदार पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस हा भिंगार मंडलात 119 मिलीमीटर झाला आहे.
हवामान विभागाने या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. नगर जिल्ह्यात दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने सोमवारी दुपारनंतर हजेरी लावली. नगर शहरात सोमवारी दुपारी तुरळक पाऊस झाला. सायंकाळनंतर पावसाने जोर धरला. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्रभर पडणारा पाऊस मंगळवारी दुपारी उघडला. या पावसाने नगर शहरासह तालुक्याला झोडपून काढले. यामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले.
आधीच नगर शहरातील रस्त्यांची वाट लागलेली असून त्यात मुसळधार पावसाने नगरकरांच्या नाकीनऊ आणले. या पावसामुळे सीना नदीला पूर आला. नदीशेजारी अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. नगर-कल्याण मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली होती. शहरातील अनेक सखल भागात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पाणी तुंबले. त्यामुळे अनेक शॉपिंग कॉम्प्लेक्समधील तळभागातील दुकानांत पाणी शिरले होते. पावसामुळे उपनगरांतील अनेक रस्ते चिखलात हरवले होते.
महापौरांकडून पाहणी; मनपा प्रशासन सज्ज
नगर-कल्याण महामार्ग, नालेगाव रस्ता, सावेडी-बोल्हेगाव रस्ता या मार्गांवर पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला. नालेगाव परिसरातील काही वसाहतींमध्ये घरांत पाणी शिरले. या स्थितीचा आढावा महापौर रोहिणी शेंडगे, मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी घटनास्थळी जाऊन घेतला. नगर शहरामध्ये पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात उद्भवल्यास महानगरपालिकेची आपत्कालीन विभागाची पथके सज्ज आहेत. नागरिकांनी पूर परिस्थिती उद्भवल्यास काही अडचणी असल्यास त्वरित अहमदनगर महापालिकेत संपर्क साधावा, असे आवाहन मनपाने केले आहे.
मंडलनिहाय पाऊस
नालेगाव 74, सावेडी 82, कापुरवाडी 82.5, केडगाव 46. 8, भिंगार 119.3, नागापुर 78, जेऊर 71, चिंचोडी पाटील 76.5, वाळकी 42.3, चास 54.8, रुई छत्तीशी 43.
अतिवृष्टीमुळे सीना नदीला पूर आला होता. नेप्ती नाक्याजवळील सीना नदी पूल अनेक वर्षांचा झाला असल्याने पुलाची अवस्था खराब झाली आहे. या पुरा मुळे कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने पुलावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.याच पार्श्वभूमीवर आ.संग्राम जगताप यांनी सीना नदीला आलेल्या पुराच्या परिस्थितीची व पुलाची पाहणी केली.
Post a Comment