“देवाच्या सुपर कॉम्प्युटरमुळे कोरोना आला, त्यानेच मरणाऱ्यांची यादी तयार केली”


दिसपूर | कोरोनाच्या भोवताली आपलं आयुष्य गुंतलं आहे. कोरोनाने आपली जीवन पद्धती पार बदलून टाकली आहे. कोरोना आला त्यादिवशीपासून अजुनही तो कुठुन आला, चिनच्या प्रयोगशाळेत तयार केला गेला, पृथ्वीवर पाप खूप झालंय म्हणून देवाने तो पाठवला अशा प्रकारची अजब वक्तव्य केली जात आहेत. सरकार चालवणारे सुद्धा या प्रकारे बोलत आहेत.

आसामचे मंत्री चंद्रमोहन पटवारी यांनी आता अजब वक्तव्य केलं आहे. निसर्गाने ठरवलं आहे की कोणाला कोरोना होईल, कोणाला होणार नाही आणि कोणाला पृथ्वीपासून दूर नेलं जाईल. हे देवाच्या सुपर कॉम्प्युटरवरून घडत आहे, हा कोरोना मानवनिर्मित नाही. कॉम्प्युटरने 2 टक्के मृत्यूसह कोविड -19 विषाणू पृथ्वीवर पाठवण्याचा निर्णय घेतला, असं मंत्री चंद्र मोहन पटवारी यांनी म्हटलं आहे.

चंद्रमोहन पटवारी हे आसाम सरकारमध्ये परिवहनमंत्री आहेत. ते आपल्या अजब वक्तव्यासाठीच ओळखले जातात. परिवहन मंत्रालयासोबतच ते उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळत आहेत. चंद्र मोहन पटवारी यांनी बुधवारी कोविड -19 मुळे मरण पावलेल्या विधवांना मदत करणाऱ्या कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केलं आहे.

कोरोना परिस्थिती हाताळण्यात जागतिक आरोग्य संघटनेला अपयश आल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं आपलं काम आपल्या पद्धतीने करण्याची गरज होती अशी टीकाही त्यांनी केली आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी यावरून मंत्र्यांवर प्रचंड टीका केली आहे. जेव्हा आपण परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरतो तेव्हा असं बोललं जातं, अशी टीका काँग्रेसने केलीये.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post