अहमदनगर | कोरोना रूग्णसंख्या कमी होत असताना राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी करण्यात येत आहे. राज्यातील मंदिरं उघडण्यात यावी, अशी भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला 10 दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अण्णा हजारे चर्चेत आहे. त्यानंतर आता आणखी एका कारणामुळे चर्चेचा विषय बनले आहेत.
काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रात अण्णा हजारे यांच्या नावाने एक खोटी बातमी छापून आली होती. ‘नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात’ या टायटलने एक खोटं वृत्त प्रसारित केलं गेलं होतं. त्यानंतर शिक्षकांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता या प्रकरणात अण्णा हजारे यांनी प्रेसनोट प्रसिद्ध केलं आहे.
समाजात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. देशाची पिढी घडवण्याचं काम शिक्षक करतात. मी शिक्षकांविषयी नेहमी आदर व्यक्त केला आहे. मात्र, माझ्या तोंडी वक्तव्य घालून समाजात द्वेष पसरवत जात असल्याचं देखील त्यांनी या प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे. शिक्षकांनी गैरसमज करून न घेता ज्ञानदानाचे काम सुरू ठेवावं, असं आवाहन देखील अण्णा हजारे यांनी केलं आहे.
दरम्यान, संबंधीत वृत्तपत्राविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं देखील अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली द्वेषभावना समाजासाठी आणि देशासाठी घातक ठरत असल्याचंं देखील अण्णा म्हणाले आहेत.
Post a Comment