बीड | बऱ्याच दिवसांच्या विसाव्यानंतर पावसानं पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून त्याची भीषणता दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच बीड जिल्ह्यातील अनेक भागांत पावसानं जोरदार हजेरी लावली असून आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, यांसह काही तालुक्यांमध्ये काल संध्याकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. बहुतांश भागात अजूनही पाऊस सुरू असून काही तालुक्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनानं 24 तास सतर्क राहून आवश्यक तिथे मदत कार्य करावं, अशा सूचना बी़ड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.
खरीप पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पाऊस थोडा थांबताच विमा कंपनी, महसूल आणि कृषी विभागामार्फत तातडीनं पंचनामे केले जातील. जिवीत, वित्त किंवा पशु हानी होऊ नये, यासाठी तातडीनं उपाययोजना केल्या जातील. नागरिकांनी काळजी घ्यावी, जलाशय, नद्या व धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावं, असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
दरम्यान, मंगळवारी मराठवाड्यासह अहमदनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत पावसानं हाहाकार उडवला आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचंही नुकसान झालं. अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पहायला मिळतंय.
Post a Comment