नवी दिल्ली | सध्या समाजमाध्यमांत वेगवेगळे गाणे प्रसिद्ध होत असतात. एखादं जुनं गाणं कधी प्रसिद्ध होईल आणि नेटकऱ्यांना भुरळ पडेल सांगता येत नाही. समाजमाध्यमांत आधी टिकटाॅकच्या माध्यमातून विविध गाण्यावर नेटकरी त्यांचे गाणं गात असताना किंवा डान्स करत असताना त्यांचे व्हिडीओ बनवत असत. पण, आता टिकटाॅकवर घातलेल्या बंदीमुळे इन्स्टाग्राम आपल्या रिल्सचा पर्याय नेटकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे . या रिल्स बनवण्यात दिग्गज कलाकारही मागे नाहीत.
सध्या भारतातील नेटकऱ्यांना अशाच एका श्रीलंकेच्या गाण्याने भुरळ घातली आहे. श्रीलंकेची गायिका आणि रॅपर योहानी अशीच काहीशी सध्या रातोरात भारतात प्रसिद्ध झाली. तिचं ‘मानिके मागे हिथे’ हे गाणं एकच चर्चेचा विषय ठरला आहे. इन्स्टाग्रामच्या 15 सेकंदाच्या रिल्समध्ये तिच्या गाण्यावर नेटकरी रिल्स बनवताना दिसत आहेत.
नेटकऱ्यांना या गाण्याचा अर्थ कळत नसला तरी, मात्र अनेकजण गाणं गुणगुणताना दिसत आहेत. योहानीचं हे गाणं श्रीलंकेच्या सिंहली या भाषेत आहे. योहानीने तिचं गाणं 22 मे ला युट्यूबवर प्रसिद्ध केलं आहे. तिच्या सहकारी संगीतकार सतीशनसोबत गाणं प्रसिद्ध केलं आहे. सध्या गाणं प्रचंड हिट झाल्याचं दिसतंय.
योहानीच्या गाण्यावर बॉलिवूडचे कलाकारही रिल्स करताना दिसत आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांनीही या गाण्यावर त्यांच्या जुन्या चित्रपटातील गाण्यास योहानीचं गाणं लावून रिल्स शेअर केला आहे. दरम्यान, आतापर्यत या गाण्याला 7.5 कोटीपेक्षा जास्त लोकांनी इन्स्टाग्रामवर पाहिलं आहे. तसेच, #ManikaMagehite हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होत आहे
Post a Comment