नेवासा | महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे यांनी शैक्षणिक वर्ष सन 2021-22 पासून इ.10 वी साठी स्वविकास व कलारसास्वाद या श्रेणी विषयाऐवजी "जलसुरक्षा" हा विषय अनिवार्य श्रेणी विषय म्हणून समाविष्ट केला आहे. याबाबद महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील सर्व शाळांना याबाबदचे परिपत्रक जारी केले आहे.
महाराष्ट्र राज्यात वारंवार पडणारा दुष्काळ आणि निर्माण होणारी पाणी टंचाई यावर प्रभावी उपाय म्हणून जलसंधारण कामाबरोबरच लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे हे लक्षात आल्यावर राज्य शासनाने सर्वस्तरावर जनजागृती व जलसाक्षरतेची मोहीम हाती घेतलेली आहे. त्यासाठी यशदा अंतर्गत स्वतंत्र जलसाक्षरता केंद्राची स्थापना करून राज्यातील गाव पातळीवर जाऊन जळसेवकांना-नागरिकांना जलसाक्षरतेचे प्रशिक्षणे दिली जात आहेत. त्याच बरोबर इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळेत अभ्यासक्रमासाठी जलसाक्षरतेची पुस्तके ही तयार करण्यात आली आहेत. तसेच इयत्ता नववी आणि दहावीसाठी पायाभूत विषयाबरोबरच अनिवार्य श्रेणी विषयासाठी महाराष्ट्र शासनाने जलसुरक्षा या विषयाची निवड सन 2020-21 पासून केली आहे. सदर पुस्तक तयार करण्यासाठी शासनाने
माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली 15 तज्ञांची विषय समिती स्थापन केलेली आहे. या विषय समितीने जलसुरक्षा या विषयाचे इयत्ता नववी साठीचे पुस्तक तयार केले असून ते सन 2020-21 वर्षापासून माध्यमिक शिक्षणामध्ये या पुस्तकाचा समावेश केलेला आहे. इयत्ता दहावीसाठी या विषयाचे पुस्तक तयार करण्याचे काम पूर्ण झाले असुन, सन 2021-22 पासुन त्याचा समावेश इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. त्यासाठी या चालू शैक्षणिक वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी ) परीक्षा सन 2021-22 परीक्षेसाठी जलसुरक्षा हा विषय अनिवार्य करण्यात आला असून स्वविकास व कलारसास्वाद (R7) या श्रेणी विषयाऐवजी जलसुरक्षा (R8) हा विषय अनिवार्य श्रेणी विषय म्हणून समाविष्ट केला असून सदर जलसुरक्षा या विषयास R8 हा विषय कोड देण्यात आलेला आहे.
Post a Comment