मुंबई | किरीट सोमय्या आणि वाद हे महाराष्ट्राला नवीन नाही. लोकसभा निवडणूक 2019 ला भाजपने तिकीट नाकारल्यापासून सतत शिवसेनेला लक्ष्य करताना दिसतात. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सोमय्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत.
राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या आरोपानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. कोल्हापूर हा मुश्रीफ यांचा गढ मानला जातो. या कोल्हापूरमध्ये जाऊन मुश्रीफ यांच्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी सोमय्या निघाले आहेत. रविवारी दिवसभर मुंबईच्या रेल्वे स्थानकावर पोलीस आणि सोमय्या यांच्यात बाचाबाची रंगली होती.
कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी सोमय्या यांना जिल्हाबंदी केली आहे. परिणामी हे प्रकरण आता जास्तच चिघळण्याची चिन्ह आहेत. मी पहिला आरोप केला तर मुश्रीफ रूग्णालयात गेले, दुसरा आरोप केला तर ते थेट जेलमध्ये जातील, अशा शब्दात सोमय्या यांनी मुश्रीफ यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात या प्रकरणावरून चांगलंच राजकीय युद्ध रंगलं आहे. सोमय्या यांना राज्य सरकार मुद्दाम अडवत आहे. ठाकरे सरकार पोलिसांच्या बळावर भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं भाजपचे नेते म्हणत आहेत. कसल्याही परिस्थितीत आपण कोल्हापूरला जाणार यावर सोमय्या ठाम आहेत.
Post a Comment