दिल्ली | देशात दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासात कालच्या (सोमवार ) तुलनेत नव्या करोना बाधितांच्या संख्येत १२ हजारांनी घट झाली आहे. मात्र सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची धाकधूक वाढत आहे.
आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३० हजार ९४१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ३५० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासात ३६ हजार २७५ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. भारतातील आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १९ लाख ५९ हजार ६८० वर पोहोचली आहे.
देशात सध्या ३ लाख ७० हजार ६४० सक्रिय रुग्ण उपचाराधिन असून आतापर्यंत ४ लाख ३८ हजार ५६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा २.१ टक्के आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा रेट ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा २.२२ टक्के इतका आहे.
केरळने वाढवलीय चिंता
दरम्यान केरळमध्ये अद्याप करोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. काल दिवसभरात केरळमध्ये १९ हजार ६२२ नवे रुग्ण सापडले असून १३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील स्थिती काय?
राज्यात काल (सोमवार) ३ हजार ७४१ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ६९६ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ६८ हजार ११२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के आहे. तसेच राज्यात काल (सोमवार) ५२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे.
Post a Comment