Healthy Living: आरोग्याला घातक मैद्याचं अर्थकारण



 एका दाण्यापासून शेकडो दाणे मिळतात, याचे ज्ञान झाल्यानंतर मनुष्याला अन्नासाठी दाही दिशा भटकण्याची गरज राहिली नाही. शेती करणारा माणूस एकाच जागी स्थिर राहून जीवन जगू लागला. एकामागोमाग एक विविध धान्ये मनुष्याने शॊधून काढली.त्यातलेच एक मुख्य धान्य म्हणजे गहू, ज्याचे सेवन अर्ध्याहून अधिक मानवजात करते. पुढे जा‌ऊन आधुनिक काळामध्ये माणूस या गव्हापासुन मैदा तयार करण्यास शिकला, ज्यामध्ये युरोपियन राष्ट्रे आघाडीवर होती. गव्हाच्या वरचे आवरण काढून टाकले की उरते फ़क्त पांढरे-शुभ्र पीठ. त्या काळामध्ये गहू वेगळे करुन तयार केलेले हे पांढरे पीठ म्हणजे एक फ़ार मोठी क्रांती आहे, असेच समजले गेले. जो भाग फ़ेकून दिला जात होता तो अनावश्यक व जे पांढरे पीठ वापरण्यासाठी स्वीकारले गेले ते पोषक असा सर्वसाधारण समज त्या काळात होता.

गव्हापासून मैदा तयार करण्याची ही पद्धत त्या काळात खर्चिक होती.त्यामुळे पोषक गुणांचे (?) व तयार करण्यास खर्चिक असे हे पांढरे पीठ (ज्याला आपण  मैदा म्हणतो तो ) खाणे ही त्या काळात तरी फ़क्त श्रीमंत पाश्चात्त्यांची मिजास होती. त्यामुळे मैद्यापासून तयार केलेले पाव, बिस्किटे, केक्स यांसारखे  खाद्यपदार्थ खाणे हे केवळ पाश्चात्त्यांनाच  शक्य होते व पूर्वेकडील देशवासीय ( आपले बापजादे) या खाद्यपदार्थांच्या  केवळ कथा ऎकायचे आणि चर्चा करायचे.

मात्र पुढे जा‌ऊन जेव्हा गव्हातला पोषक भाग फ़ेकला जातोय  व शरीराला घातक असा  मैदा आपण खातोय, हे संशॊधकांनी सांगितल्यानंतर आणि विविध शास्त्रज्ञांनी मधुमेहापासुन कॅन्सरपर्यंत अनेक रोगांना आमंत्रण देणारा पदार्थ म्हणजे मैदा हे साधार पटवल्यानंतर श्रीमंत-पाश्चात्यांनी मैद्याचे सेवन बंद केले.

पण मैद्यामुळे मिळणा~या धन-संपत्तीचे काय? त्या पैशावर पाणी कसे सोडायचे?मग हे मैद्याचे खाद्यपदार्थ विकण्यासाठी उत्तम देश कोणता? अर्थातच भारत! कारण जाहिरात केली की भारतामध्ये काहीही विकता येते!

सुरूवातीला पाव, खारी, बटर, नानकटाई असे एका मर्यादेत  बेकरीमधून  मिळणारे ;मात्र तरीही त्या काळात सुद्धा घराघरातून खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ विसाव्या शतकाच्या अंतिम दशकामध्ये भारतीयांवर विविध दिशांनी बरसू लागले.एकाहून एक आकर्षक केक्स, एकाहून एक खुसखुशीत बिस्किटे, पाश्चात्त्यांच्या हॉटेल्समध्ये तर पावांच्या खाद्यान्नांचे  वेगवेगळे प्रकार हे सगळे मागील दोन-तीन दशकांमध्ये   उपलब्ध झाल्यामुळे आपण भारतीय काय हरखून गेलॊ. पण हे मैद्याचे पदार्थ खाऊनच आपला समाज स्थूल आणि रोगी बनला आणि आता तर मैद्याचे पदार्थ आपल्या नित्य सेवनाचे पदार्थ झाले आहेत. गंमत म्हणजे ज्या पाश्चात्त्यांनी मैद्याचे पदार्थ खायला शिकवले, ते मात्र आज मैद्याला तोंडही लावत नाहीत.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post